युद्धविरामाच्या अखेरीस संवादाची वाट!

पाकिस्तानात चर्चेला इराणची तयारी

    दिनांक :21-Apr-2026
Total Views |
तेहरान,
Iran ready for talks in Pakistan इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीत महत्त्वाचा टप्पा गाठला जात असून दोन्ही देशांमधील संघर्ष थांबवण्यासाठी चर्चेची हालचाल वेगाने सुरू झाली आहे. आजच्या घडीला दोन्ही देशांतील युद्धविरामाचा कालावधी संपत असताना परिस्थिती अधिक संवेदनशील बनली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला जाणार नसल्याचे स्पष्ट केले असले तरी दोन्ही बाजूंमध्ये तोडगा निघेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
 
 
 
talks in Pakistan
 
दरम्यान, शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चेची पुढील फेरी इस्लामाबादमध्ये होणार असून या बैठकीकडे जागतिक पातळीवर लक्ष लागले आहे. सुरुवातीला इराणने धमक्यांच्या पार्श्वभूमीवर चर्चेत सहभागी होण्यास नकार दर्शवला होता. मात्र आता इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून सकारात्मक संकेत मिळाले आहेत. मोजतबा खामेनेई यांनी स्वतः पुढाकार घेत इराणी प्रतिनिधीमंडळाला पाकिस्तानमध्ये जाऊन चर्चेत सहभागी होण्याची परवानगी दिली आहे.याआधी इराणने चर्चेसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्यामुळे परिस्थिती अधिक चिघळली होती. त्यानंतर अमेरिकेकडून पुन्हा हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. काही अहवालांनुसार, इराणमधील लष्करी घटकांच्या दबावामुळे ही चर्चा पुढे ढकलली जात होती. तरीही आता परिस्थितीत बदल होत असल्याचे दिसून येत आहे.
 
नाकेबंदी कायम राहणार
दरम्यान, होर्मुझ सामुद्रधुनीबाबत अमेरिकेची भूमिका कठोरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये सुरू असलेली नाकेबंदी कायम ठेवण्यात येणार असल्याचे अमेरिकेने सांगितले आहे. दोन्ही देशांमध्ये अंतिम करार होईपर्यंत ही कारवाई सुरू राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या नाकेबंदीमुळे इराणवर मोठा आर्थिक दबाव निर्माण होत असून त्याचा परिणाम चर्चेवरही होत असल्याचे मानले जात आहे. एकूणच, वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता संवादाचा मार्ग खुला झाल्याने परिस्थितीत सकारात्मक बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी चर्चेमध्ये दोन्ही देश कायमस्वरूपी तोडग्यावर पोहोचतात का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.