किरीट सोमय्या पुन्हा परतवाड्यात

लैंगिक शोषण प्रकरणाचा घेतला आढावा

    दिनांक :21-Apr-2026
Total Views |
अचलपूर,
kirit-somaiya : अचलपूर-परतवाडा शहरात उघडकीस आलेल्या अश्लिल व्हिडिओ प्रकरणाने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळलेली असतानाच सोमवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी परतवाडा पोलिस स्टेशन येथे अचानक भेट देत तपासाचा आढावा घेतला. या भेटीदरम्यान त्यांनी चौकशी अधिकार्‍यांसोबत बंदद्वार चर्चा करत प्रकरणातील प्रत्येक पैलू बारकाईने समजून घेतला. यावेळी आमदार प्रवीण तायडे हे प्रामुख्याने उपस्थित असल्याची माहिती आहे. या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीमुळे प्रकरणाचे गांभीर्य अधिक अधोरेखित झाले असून, पीडित मुलींच्या न्यायासाठी ठोस पावले उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
 
 
LJLK
 
 
 
सदर प्रकरण हे केवळ गुन्हेगारीचा विषय नसून समाजाच्या नैतिकतेला आणि महिला सुरक्षिततेला थेट आव्हान देणारे आहे, असे मत सोमय्या यांनी व्यक्त केले. अशा प्रकारांना थारा दिला जाणार नाही, आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, यासाठी त्यांनी पोलिस प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या. महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने या प्रकरणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज अधोरेखित करत, शहरात पुन्हा अशा घटना घडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावरही भर देण्यात आला. शाळा, महाविद्यालय परिसर, सार्वजनिक ठिकाणे तसेच सोशल मीडियावरील वाढत्या गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक कडक यंत्रणा उभारण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
 
 
दरम्यान, या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने तातडीने ठोस कारवाई करून पीडितांना न्याय द्यावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. या पृष्ठभूमीवर राजकीय स्तरावरही हालचाली वेग घेत असल्याचे चित्र दिसत आहे. परतवाडा पोलिसांनी तपासाची गती वाढवली असून, संबंधित आरोपींविरोधात ठोस पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.