गडचिरोली,
Namo Udyan Gadchiroli, गडचिरोली शहराच्या सौंदर्यवृद्धीबरोबरच नागरिकांना विरंगुळा आणि आरोग्यदायी वातावरण मिळावे, या उद्देशाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक 11 मध्ये ‘नमो उद्यान’ उभारणीस प्रारंभ करण्यात आला आहे. या उद्यानाचे भूमिपूजन नगराध्यक्ष अॅड. प्रणोती सागर निंबोरकर, उपाध्यक्ष निखिल चरडे, बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर, नगरसेवक लीलाधर भरडकर, नगरसेविका प्रतिभा कुंबरे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
‘नमो उद्यान’मध्ये नागरिकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये आकर्षक हरित परिसर, फिरण्यासाठी प्रशस्त वॉकिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी खेळण्यांची साधने, व्यायामासाठी ओपन जिम, बसण्याची सोय तसेच सुशोभीकरणासाठी विविध प्रकारची वृक्षारोपण योजना यांचा समावेश असेल. या उद्यानामुळे परिसरातील नागरिकांना सकाळ-संध्याकाळ आरोग्यदायी वातावरणात वेळ घालवण्यासाठी उत्तम पर्याय उपलब्ध होणार आहे.
भूमिपूजनप्रसंगी नगरपरिषद पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरपरिषदेकडून राबविण्यात येणार्या या उपक्रमामुळे शहरातील हरित क्षेत्रात वाढ होऊन पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होणार आहे. शहराच्या विकासासाठी ‘नमो उद्यान’ प्रकल्पामुळे प्रभाग क्रमांक 11 च्या विकासाला नवे आयाम प्राप्त होणार असल्याचे मानले जात आहे.