कर्मचाऱ्याला मारहाण करून 11 हजार लुटले
तीन युवकांविरोधात गुन्हा दाखल
महागाव,
Phulsavangi petrol pump फुलसावंगी येथील पेट्रोल पंपावर किरकोळ वादातून कर्मचाऱ्याला गट्टू आणि फरशीने बेदम मारहाण करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. या प्रकरणी महागाव पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपींनी तक्रारकर्त्याच्या खिशातील 11 हजार रुपये रोख हिसकावून नेल्याचाही आरोप आहे.
प्राप्त माहितीनुसार, मनोज संजय भगत (वय 29, फुलसावंगी) हे गावातील पेट्रोल पंपावर मजूर म्हणून काम करतात. रविवार, 19 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 च्या सुमारास मनोज आणि त्याचे सहकारी पंपावर कर्तव्यावर असताना आरोपी त्या ठिकाणी आले. पेट्रोल भरण्याच्या कारणावरून आरोपींनी मनोज आणि त्यांच्या सहकाèयांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. आरोपींनी तेथे पडलेले गट्टू आणि फरशीचे तुकडे उचलून मनोज व त्याच्या सोबत्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत मनोज गंभीर जखमी झाला आहे.
Phulsavangi petrol pump केवळ मारहाण करूनच आरोपी थांबले नाहीत, तर त्यांनी मनोज भगत याच्या खिशातील 11,000 रुपये रोख बळजबरीने हिसकावून घेतले आणि घटनास्थळावरून पळ काढला. जखमी अवस्थेत मनोजने पोलिस ठाणे गाठून आपबीती सांगितली. महागाव पोलिसांनी जिवा उर्फ अजय बोक्से (वय 25, फुलसावंगी), विकास उर्फ विक्या सुभाष देवकर (वय 32, काळी टेंभी) व एक अनोळखी तरुणाच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार धनराज निळे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक अमोल राठोड करीत आहेत. या घटनेमुळे फुलसावंगी परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.