नाशिकनंतर पुण्यातही 'त्या' घटनेची पुनरावृत्ती!

आयटी कंपनीतील प्रकारामुळे खळबळ

    दिनांक :21-Apr-2026
Total Views |
पुणे
Pune IT company नाशिकमधील आयटी कंपनीतील वादग्रस्त प्रकरणानंतर आता पुण्यातील आयटी हब हिंजवडी परिसरातील एका बहुराष्ट्रीय कंपनीशी संबंधित नव्या प्रकारामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची दखल राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतली असून त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना तातडीने चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
 

Pune IT company 
मिळालेल्या माहितीनुसार, काही कर्मचाऱ्यांकडून कार्यालयातील विश्रांती कक्षाच्या (रेस्टिंग रूम) वापराबाबत तक्रारी समोर आल्या आहेत. या तक्रारींमध्ये काही विशिष्ट गटांकडून या कक्षाचा नियमित वापर धार्मिक विधींसाठी केला जात असल्याचा आणि त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी प्रवेश मर्यादित केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे कार्यस्थळी सुविधा वापरातील समानता, कामकाजातील शिस्त आणि कर्मचाऱ्यांच्या हक्कांवर परिणाम होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, कार्यस्थळी कोणत्याही प्रकारचा भेदभाव, दबाव किंवा नियमभंग सहन केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. प्राप्त तक्रारी अद्याप प्राथमिक स्वरूपात असून त्यांची सत्यता तपासणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.विशेषतः महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास, दबाव किंवा असुविधा होत आहे का, याचीही स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या असून, लवकरच चौकशी अहवाल सादर होण्याची शक्यता आहे.दरम्यान, नाशिकनंतर पुण्यातील या नव्या प्रकरणामुळे राज्यातील आयटी क्षेत्रातील कामकाज संस्कृती, कार्यस्थळ सुरक्षा आणि व्यवस्थापन पद्धती याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.