वर्धा,
refusal-to-pay-the-contractor : येथील सार्वजनिक बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासुन वादाग्रस्त ठरत आले आहे. बुब नामक कार्यकारी अभियंता लाच घेताना अडकल्या गेला होता. त्यानंतर पंतप्रधान दौर्यातील मुरूम प्रकरण पुढे आले. आता विद्यमान कार्यकारी अधिकार्यांनी काही ठेकेदाराला त्रास देणे सुरू केले आहे. दरम्यान, आज राजेश सराफ या ठेकेदाराने कार्यकारी अभियंता एकनाथ टिकले यांना जाब विचारला.

मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मार्च रोजी रात्री ११ वाजता राज्य शासनाकडून ठेकेदारांचे पैसे देण्यासाठी पैसे आले. त्यातून प्रत्येक ठेकेदाराला कामाचे पैसे देणे अपेक्षित होते. परंतु, कार्यकारी अभियंता टिकले यांनी जवळपास ५३ ठेकेदारांचे पैसे १६ एप्रिलपर्यंत राष्ट्रपतींच्या दौर्याचे कारण सांगुन अडवून ठेवले. या काळात कार्यकारी अभियंत्यांने ठेकेदाराचा फोनही उचलला नाही आणि भेटही घेतली नाही. १ एप्रिलपासुन १५ दिवसाच्या आत ठेकेदारांना जीएसटीचे पैसे भरणे आवश्यक असते. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाने पैसेच दिले नाहीत. त्यानंतर ४९ ठेकेदारांचे पैसे दिले. परंतु, ४ ठेकेदारांना अद्यापही पैसे दिली नाहीत. तसेच ७० ते ८० लोकांचे ६० ते ८० टके डिपॉझिट ठेवून घेतले आहे. नियमानुसार कामाची पाहणी करणे आदी कारणाने १० टके निधी डिपॉझिट ठेवल्या जाऊ शकतो. परंतु, येथे ६० ते ८० टके निधी डिपॉझिट ठेवण्यात आल्याचा आरोप सराफ यांनी केला.
या संदर्भात कार्यकारी अभियंता टिकले यांच्यासोबत संपर्क केला असता आपण तीन दिवसानंतर या विषयावर बोलू असे त्यांनी सांगितले. डिपॉझिटचे पैसे नियमानुसार घेतल्या गेल्याचेही त्यांनी सांगितले.