ज्येष्ठ नेते शरद पवार रुग्णालयात दाखल

    दिनांक :21-Apr-2026
Total Views |
मुंबई 
Sharad Pawar admitted to hospital राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) ज्येष्ठ नेते शरद पवार मंगळवारी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात आणि कार्यकर्त्यांमध्ये चिंतेची भावना निर्माण झाली आहे. ८५ वर्षीय ज्येष्ठ नेत्यांना नियमित आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीत कोणतीही गंभीर अडचण नसल्याची माहिती समोर आली आहे. या कारणामुळे त्यांचा नियोजित बारामती दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, पवार यांची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि काही आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यासाठीच त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. तपासणीचे अहवाल आल्यानंतरच पुढील स्थिती स्पष्ट होईल, असेही त्यांनी नमूद केले.
 
 
Sharad Pawar
 
याआधीही काही महिन्यांपूर्वी आरोग्याच्या कारणामुळे त्यांना उपचार घ्यावे लागले होते, मात्र त्यानंतर ते पुन्हा सक्रिय राजकीय कामकाजात सहभागी झाले होते. पवार रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी समजताच बारामतीसह राज्यातील अनेक भागांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. मंगळवारी त्यांच्या बारामती दौऱ्यात अनेक महत्त्वाच्या बैठकांचा समावेश होता, परंतु वैद्यकीय सल्ल्यानुसार तो कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. पक्षाकडून कार्यकर्त्यांना रुग्णालयात गर्दी न करण्याचे तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.