मेक्सिकोतील प्राचीन पिरॅमिडवर गोळीबार; एक ठार

    दिनांक :21-Apr-2026
Total Views |
मेक्सिको सिटी
Shooting at ancient pyramid in Mexico मेक्सिको मधील प्राचीन आणि प्रसिद्ध तेओतिहुआकान या पुरातत्व स्थळी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सुमारे दोन हजार वर्षे जुन्या पिरॅमिड परिसरात घडलेल्या या हल्ल्यात एका कॅनडातील महिलेचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर संबंधित व्यक्तीने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अचानक झालेल्या गोळीबारामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि अनेकांनी जीव वाचवण्यासाठी पळापळ केली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हल्लेखोराची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नसून त्याने गर्दीत अंधाधुंद गोळीबार केल्यानंतर स्वतःवरही गोळी झाडली.
 
 
 
Mexico
या घटनेत काही जणांना गोळीबारामुळे दुखापत झाली, तर काही जण चेंगराचेंगरीत जखमी झाले. जखमींमध्ये विविध देशांतील पर्यटकांचा समावेश असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. काहींना किरकोळ दुखापती झाल्याने घटनास्थळीच प्राथमिक उपचार देण्यात आले. या पिरॅमिड परिसराची ओळख जगभरातील पर्यटकांमध्ये मोठी असून तो प्राचीन संस्कृतीचा महत्त्वाचा ठेवा मानला जातो. मून पिरॅमिडपरिसरात ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. हा उंच आणि भव्य पिरॅमिड पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे येत असतात.
 
घटनेनंतर सुरक्षादलांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. संशयिताकडून शस्त्रसामग्री जप्त करण्यात आली असून सर्व पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. या घटनेचा सखोल तपास सुरू करण्यात आला असून संबंधित देशांच्या अधिकाऱ्यांनीही चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पर्यटन क्षेत्रावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्राचीन वारसा असलेल्या या स्थळी घडलेल्या हिंसक घटनेने जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे.