मेळघाटातील नद्या एप्रिलमध्येच आटल्या

वन्यजीवांसमोर पाण्याचे गंभीर संकट

    दिनांक :21-Apr-2026
Total Views |
रवि नवलाखे,
धारणी, 
rivers-in-melghat : नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला आणि घनदाट जंगलांनी वेढलेला मेळघाट परिसर सध्या तीव्र पाणीटंचाईच्या छायेत आला आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कुशीतून वाहणार्‍या अनेक प्रमुख नद्या यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच आटताना दिसत असून, पर्यावरणीय र्‍हासाचे गंभीर संकेत समोर येत आहेत. एप्रिल महिन्यातच नद्यांची पातळी लक्षणीयरीत्या घटल्याने वन्यजीवांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.
 
 

MELGHAT 
 
 
 
मेळघाटातून वाहणार्‍या तापी, गडगा, सिपना, खंडू, खापरा, डवाल, कोकरी आणि तलवार या प्रमुख नद्यांचा समावेश होतो. यापैकी काही नद्या पूर्वी बारमाही म्हणून ओळखल्या जात असताना, यंदा मात्र त्या वेळेआधीच आटल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी, जंगलातील वाघ, बिबट्या, हरणे आणि इतर वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकंती करत असून, मानव-वाघ संघर्ष वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
 
 
स्थानिक वनप्रेमी आणि नागरिकांच्या मते, जंगलातील पाणवठ्यांचे योग्य नियोजन न होणे, अनियंत्रित वृक्षतोड, तसेच बदलते हवामान हे या परिस्थितीमागील प्रमुख कारणे आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात वनविभागाकडून कृत्रिम पाणवठे निर्माण करण्यासाठी निधी खर्च केला जातो, मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी हे पाणवठे कोरडेच असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. या पृष्ठभूमीवर भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज अधोरेखित होत आहे. प्रमुख नद्यांवर लहान-मोठे साठवण प्रकल्प, कोल्हापुरी बंधारे उभारणे, जलसंधारणाची कामे गतीने राबविणे आणि नैसर्गिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे.
 
 
दरम्यान, संबंधित प्रशासन आणि वनविभागाने या गंभीर परिस्थितीकडे तातडीने लक्ष देऊन ठोस पावले उचलावीत, अन्यथा मेळघाटातील जैवविविधतेवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.