अधमांचा उधम रोखा!

    दिनांक :21-Apr-2026
Total Views |
अग्रलेख...
women's safety सातत्याने संकटांना सामोरे जाण्याची वेळ येऊ लागली की त्याची सवयच होऊन जाते. संकटे हा जीवनशैलीचाच एक भाग वाटू लागतो आणि सततच्या संकटांची सवय झाली की त्याचे गांभीर्यही कमी होऊ लागते. काही संकटे साधीसुधी नाहीत, तरीही त्याबाबतच्या सावधगिरीचे भान मात्र अद्याप म्हणावे तितक्या गांभीर्याने समाजात रुजलेले दिसत नाही. गेल्या काही वर्षांत आदळणार्‍या काही बातम्यांची मुळे या संकटामध्ये रुतलेली असावीत असे वाटण्याजोगी परिस्थिती आता मात्र प्रकर्षाने जाणवू लागली आहे आणि समाजाचा, कुटुंबांचा महत्त्वाचा घटक असलेल्या महिलांपर्यंत या संकटाचे पाश पोहोचू लागले आहेत. खरे म्हणजे, नाशिक जिल्ह्यातील भोंदू कॅप्टन अशोक खरातच्या अटकेनंतर एकामागून एक उजेडात येत असलेल्या गुन्ह्यांतून लैंगिक अत्याचाराच्या कहाण्या समोर लागल्यावर या संकटाची जाणीव समाजात तीव्र होऊ लागली असली, तरी त्याची सुरुवात मात्र, त्याआधी कित्येक दशकांपासूनच झालेली असावी. लोकांच्या श्रद्धा आणि अंधश्रद्धांच्या समजुतींमागील एक धूसर सीमारेषा पुसून टाकून अंधश्रद्धा म्हणजेच खरी श्रद्धा असे भासविण्याच्या धंद्यातून या संकटाने शिरकाव केला असला, तरी अलिकडच्या काही घटना पाहता, त्याचे रूप केवळ लैंगिक आर्थिक गुन्हेगारी, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यापुरते सीमित राहिलेले नसून त्याला कट्टर धर्मवेडाचीही किनार असल्याचे दिसू लागले आहे.
 
 
ashok
 
खरात नावाच्या भोंदूच्या कारवाया अंधश्रद्धांचा स्वार्थी फायदा उपटून लैंगिक विकृतीचे कंड शमविण्यापुरत्या आणि लोकांची आर्थिक लुबाडणूक करण्यापुरत्या मर्यादित असतील, पण विदर्भाच्या अमरावतीमधील परतवाडा-अचलपुरातून उघडकीस आलेल्या लैंगिक शोषणाच्या विकृत गुन्हेगारीने त्या मर्यादाही ओलांडल्याचे आहे. या गुन्ह्याच्या तपासातून उघडकीस येत असलेल्या तपशिलांचा विचार केल्यास, धर्मद्वेषाच्या आणि धर्मप्रसाराच्या कट्टरतेचा एक व्यापक कट आखला गेल्याच्या अगोदरपासूनच व्यक्त होत असलेल्या शंकेला बळ मिळत असल्याच्या भावनेने संपूर्ण समाजजीवन ढवळून निघाले आहे. अचलपुरातील एका १९ वर्षांच्या तरुणाविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपशील अस्वस्थ करणारा तर आहेच, पण या भयंकर संकेत देणारेही आहे. गेल्या काही दिवसांत समाजमाध्यमांच्या वेगवेगळ्या मंचावरून असंख्य अश्लील चित्रफिती फैलावत गेल्या आणि लैंगिक विकृतीचा कंड शमविताना धार्मिक कट्टरतावादाच्या कटाचे संकेतही स्पष्ट होऊ लागले. जवळपास १८० युवती या लैंगिक विकृतीची शिकार झाल्याची शंका व्यक्त होत असून त्यापैकी अनेकजणी अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येते. या युवतींना समाजमाध्यमाच्या मंचावरून आपल्या आभासी जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणे व त्याच्या चित्रफिती समाजमाध्यमांवरच प्रसृत करण्याची धमकी देऊन त्यांच्यावर धार्मिक बाबींची सक्ती करण्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. खरात प्रकरणापाठोपाठ असेच एक प्रकरण नाशिकमधील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत उघडकीस आले होते.
 
 
गेल्या सुमारे दोन वर्षांत महाराष्ट्रात women's safety  महिला व अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या समाजमन अस्वस्थ झाले आहे. केवळ बेपत्ता होणार्‍या महिला-मुलींची वाढती संख्या एवढे एकच या अस्वस्थतेचे कारण नाही. प्रत्येक वेळी एखादी मुलगी हरवते, तेव्हा तिच्या सुरक्षिततेची चिंता, कुटुंबीयांची हतबलता आणि पोलिस यंत्रणेवर वाढणारा ताण या सर्व बाजू स्पष्टपणे दिसून येत होत्या. आता मात्र या गंभीर प्रश्नाकडे पाहताना आणखी एक वेगळाच मुद्दा येऊ पाहात आहे. काही घटना, काही आरोप आणि काही राजकीय विधानांमुळे महिला व मुलींचे बेपत्ता होणे आणि काही कट्टरवाद्यांकडून आखल्या जाणार्‍या धर्मांतराच्या कटाच्या कहाण्या यांच्या संबंधींचीही चर्चा सुरू झाली आहे. वास्तवाच्या कसोटीवर हे संबंध किती टिकतात, हे अद्याप पुरेसे स्पष्ट झालेले नसले, तरी महिला व मुलींचे बेपत्ता होणे आणि परतवाडा येथील काही घटनांतून समोर येणारे धागेदोरे जोडल्यास याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज मात्र आता अधोरेखित होऊ लागली आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत सुमारे ९४ हजार महिला व मुली बेपत्ता झाल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्यापैकी सुमारे ७२ टक्के प्रकरणांचा छडा लागला असला तरी अद्याप काही महिला-मुली मात्र सापडलेल्या नाहीत. कारणे शोधताना संबंधित यंत्रणा आजवर काही पठडीबाज मीमांसा करताना दिसत असत. या बेपत्ता होणार्‍यांपैकी काही प्रकरणे प्रेमसंबंधाशी जोडली गेलेली असतात, तर काही प्रकरणांत घरगुती वादातून महिला-मुली घराबाहेर पडत असल्याचे निष्कर्ष निघतात. अत्याचार, दडपण अशा कारणांमुळे घर सोडून निघून जाण्याची मानसिकता एखाद्या क्षणी बळावते, असेही या यंत्रणांना वाटत होते. काही बेपत्ता होण्याच्या प्रकरणांत मानवी तस्करी करणार्‍या व महिलांना अनैतिक धंद्यांच्या जाळ्यात ओढणार्‍या टोळ्यांचा सहभाग असावा असेही निष्कर्ष काढले गेले होते. यवतमाळमधील प्रकरणात, मुलींची तस्करी करून त्यांना अनैतिक व्यवसायात ढकलण्याचा कट असावा अशीही चर्चा होती. नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीतील धार्मिक कंगोरे समोर येऊ लागल्याने आता मात्र, या प्रकरणांच्या तपासाच्या शोधास धार्मिक दिशेने नेण्याची गरज निर्माण झाली आहे. किशोरवयीन मुलींच्या बाबतीत प्रेमसंबंधातून घरातून पळून जाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. यामध्ये धर्मांतराचा घटक काही वेळा नंतर येऊ शकतो; परंतु ते मूळ कारण नसते. म्हणजेच, धर्मांतर हे मुलींच्या किंवा महिलांच्या बेपत्ता होण्याचे कारण नसले, तरी यानंतरचा परिणाम म्हणून याकडे डोळेझाक करता येणार नाही, असा देणारी अनेक प्रकरणेही अलिकडे उघडकीस आली आहेत. महाराष्ट्रातील अनेक भागांत मानव तस्करीचे जाळे अजूनही सक्रिय आहे. गरीब कुटुंबांतील मुलींना नोकरीच्या आमिषाने बाहेर नेले जाते आणि नंतर त्यांचे शोषण केले जाते. काही ठिकाणी अल्पवयीन मुलींचे जबरदस्तीने लग्न लावले जाते. शहरी भागांत सोशल मीडियाद्वारे ओळखी होतात, विश्वास संपादन केला जातो आणि फसवणूक केली जाते. घरगुती हिंसा, शिक्षणातील खंड आणि आर्थिक असुरक्षितता हे देखील महत्त्वाचे घटक आहेत.
 
 
या सर्व वास्तव समस्या असल्या तरी धर्मांतराच्या मुद्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, अशी परिस्थिती मात्र आता दिसू लागली आहे. त्याकडे दुर्लक्ष करून कालपरवापर्यंतच्या पठडीबाज कारणांनाच वास्तव समस्या मानून उपाययोजना केल्यास त्याची दिशा भरकटण्याचीही शक्यता नजरेआड करता येणार नाही. अर्थात, प्रत्येक प्रकरणात धर्मांतराचे कारण असेलच असे नसले तरी एकही घटना धर्मांतराशी संबंधित नाही असेही म्हणता येणार नाही. त्यामुळे, ‘बेपत्ता’ प्रकरणांकडे केवळ शोधमोहीम म्हणून नव्हे, तर संभाव्य गुन्ह्याच्या दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे. यवतमाळमधील राळेगाव तालुक्यातील ३४ आदिवासी मुली गेल्या काही महिन्यांत बेपत्ता झाल्या असून त्यांची करून धर्मांतर करण्यात आल्याच्या आरोपामुळे या भीतीत भर पडली आहे. या संदर्भातील तक्रारीनंतर पोलिसांनी गोळा केलेल्या काही कथित ध्वनिफितींमधून हाती आलेले धागेदोरे अस्वस्थ करणारे आहेत. गरीब आदिवासी women's safety  मुलींना पैशांचे आमिष दाखवून त्यांची तस्करी करणे, अल्पवयीन मुलींची प्रौढ पुरुषांसोबत लग्ने लावून देणे व धर्मांतर करणे असे प्रकार घडत असल्याचा आरोप जात आहे. नागपुरातही काही युवतींचे लैंगिक शोषण करून धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू असावा असा पोलिसांचाही कयास आहे. त्यामुळे लैंगिक अत्याचारतून महिलांचे शोषण करणे हा धर्मांतराच्या सक्तीचा नवा कट आखला गेला असावा या भीतीने समाज अस्वस्थ आहे. राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनात धर्मांतराविरोधातील विधेयक संमत झाले आहे. त्याचे कायद्यात रूपांतर होण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अशी किती प्रकरणे पुढे येत राहणार ही भीती मात्र समाजाला सतावते आहे. समाजाला निर्भय बनवायचे असेल तर या सार्‍या अधमांचा उधम रोखलाच पाहिजे! पप