नवी दिल्ली,
Abhishek Sharma's stormy innings दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या अभिषेक शर्माने आपल्या दमदार फलंदाजीमागील कारण स्पष्ट केले. या सामन्यात त्याने नाबाद १३५ धावांची भव्य खेळी साकारत प्रतिस्पर्धी गोलंदाजांची जोरदार धुलाई केली.सामन्यादरम्यान हैदराबादच्या संघाने दोन गडी गमावून तब्बल २४२ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ १९५ धावांपर्यंतच मर्यादित राहिला आणि हैदराबादने मोठा विजय मिळवला. अभिषेकने ६८ चेंडूंमध्ये १० चौकार आणि १० षटकार ठोकत ही खेळी उभी केली.
सामन्यानंतर बोलताना अभिषेक म्हणाला की, सुरुवातीला संघाने वेगाने धावा करण्याची योजना आखली होती, मात्र खेळपट्टी अपेक्षेपेक्षा संथ असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपली रणनीती बदलली. या बदलामुळेच मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले, असे त्याने सांगितले.त्याने संघ व्यवस्थापनाचे विशेष आभार मानले आणि सांगितले की, त्याला स्वतःच्या शैलीत खेळण्याची मुभा देण्यात आली. प्रेक्षकांसमोर खेळताना आनंद मिळतो आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच अशी खेळी शक्य झाली, असेही तो म्हणाला.
संघातील सकारात्मक वातावरणाचेही त्याने कौतुक केले. गेल्या काही काळापासून संघात निर्माण झालेले वातावरण त्यांच्या कामगिरीसाठी महत्त्वाचे ठरत असल्याचे त्याने नमूद केले. त्याला नेहमीच आक्रमक पद्धतीने खेळायचे होते आणि ती संधी येथे मिळत असल्याचे त्याने स्पष्ट केले. शतक पूर्ण केल्यानंतर केलेल्या आनंद व्यक्त करण्याच्या पद्धतीबद्दल विचारले असता, तो म्हणाला की हा त्याचा खास अंदाज असून प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेमाचे ते प्रतीक आहे.