वॉशिंग्टन,
America 'blocked' the Strait of Hormuz अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि होर्मुझ सामुद्रधुनीबाबत मोठे वक्तव्य करत आंतरराष्ट्रीय राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. इराणला ही सामुद्रधुनी बंद करायची नाही, कारण ती खुली राहिल्यास त्यांना दररोज मोठा आर्थिक फायदा होतो, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. मात्र आपण घेतलेल्या भूमिकेमुळेच इराण बंद करण्याचा विचार करत असल्याचा दावा त्यांनी केला.ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, जर ही महत्त्वाची जलमार्ग बंद झाली तर इराणला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागेल. त्यामुळेच ते आपली प्रतिमा वाचवण्यासाठी विविध भूमिका मांडत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी असेही म्हटले की काही काळापूर्वी काही जणांनी त्यांच्याशी चर्चा करताना इराणच्या अटी आणि दबावाचा उल्लेख केला होता.
इराणचे आरोप पूर्णपणे खोटे
दरम्यान, इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव अद्याप कायम असून युद्धविराम आणि चर्चा याबाबत दोन्ही बाजूंमध्ये मतभेद आहेत. इराणने आपली भूमिका ठाम ठेवत अमेरिकेच्या काही अटी मान्य करण्यास नकार दिला आहे. विशेषतः अणुकार्यक्रम आणि इतर धोरणांवरून इराण मागे हटण्यास तयार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.दुसरीकडे, ट्रम्प यांनी यापूर्वी इराणने काही अटी मान्य केल्याचा दावा केला होता, मात्र इराणने हे सर्व आरोप फेटाळून लावत ते पूर्णपणे खोटे असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढताना दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भविष्यात काही प्रमाणात चर्चा किंवा युद्धविराम वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच इराणी बंदरांवरील काही निर्बंध उठवण्याबाबतही चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावामुळे आधीच परिस्थिती गंभीर असून अनेक ठिकाणी लष्करी हालचाली आणि हल्ल्यांमुळे मोठे नुकसान झाले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अमेरिका आता संघर्षातून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत असल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू आहे.