वाढत्या उन्हात बाहेर जाण्यास टाळावे : जिल्हाधिकारी

- आढावा बैठकीतून नागरिकांना आवाहन व संबंधितांना निर्देश

    दिनांक :22-Apr-2026
Total Views |
गोंदिया,
gondia-news : जिल्ह्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, सद्या जिल्ह्यात ४१ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली आहे. उष्णतेच्या लाटेपासून उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, शक्यतो उन्हात बाहेर जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले.
 

kl 
 
 
 
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मंगळवारी २१ एप्रिल रोजी उष्मालाट पुर्वतयारी बाबत आढावा घेण्यात आला, यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, उपजिल्हाधिकारी मानसी पाटील, उपजिल्हाधिकारी विजय अवधाने, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांचेसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. गोंदावले म्हणाले, जिल्ह्यात सध्या तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून, पुढील काही दिवसात ते अधिक वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेच्या परिणामाबाबत प्रत्येक विभागाने दक्ष राहून काम करावे. उष्माघात होऊन मृत्यू होणार नाही, याची योग्य ती खबरदारी घ्यावी. नागरिकांनी आपल्या घरी ग्रीन मॅटचा वापर करावा, प्रत्येक आरोग्य संस्थेत उष्माघात कक्ष स्थापन करण्यात यावे. उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास विलंब न करता जवळच्या रुग्णालयात उपचार घ्यावे. उष्माघाताच्या रुगणांसाठी आरोग्य केंद्रांमध्ये स्वतंत्र वैद्यकीय वार्डाची व्यवस्था करावी. लहान मुले, दिव्यांग व्यक्ती, स्त्रिया, वृध्द आणि मजूर यांसारख्या असुरक्षित गटांसाठी विशेष व्यवस्था करावी. असे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले.
 
 
अभ्यांगतांना भेटण्याची वेळ बदला...
 
 
साधारणत: प्रत्येक शासकीय कार्यालयात जनतेला भेट देण्यासाठी दुपारी २ ते ४ ही वेळ देण्यात येते. परंतु सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे नागरिकांना भेटण्याची वेळ ही सकाळी १० ते ११ किंवा सायंकाळी ५ ते ६ अशी वेळ देण्यात यावी. तसेच शाळा-महाविद्यालयाची वेळ सुध्दा सकाळी ठेवण्यात यावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.