परतवाडा फाईल्स
अमरावती,
paratwada-files : विशेष तपास पथकाने बुधवारी दुपारी परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातला मुख्य आरोपी अयान अहमद याला चौकशीसाठी त्याच्या मित्राच्या घरी पायदळ नेले. या मित्राला त्याने मोबाईल विकाला होता. तो मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
अयान अहमद याच्या पोलिस कोठडीत कालच वाढ करण्यात आली होती. अयाने ज्या मोबाईलमध्ये व्हिडीओ काढले होते, त्या मोबाईलमधला सर्व डाटा डिलीट करून तो एक महिन्यापूर्वी एका मित्राला विकला होता. तपासात ही माहिती समोर आल्यावर विशेष पथकाने आज अयानला थेट त्या मित्राच्याच घरी पायदळ नेले. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. तेथे देऊन पोलिसांनी दोघांची समारासमोर चौकशी केली. विकलेला मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. त्या मोबाईलमधला डाटा पोलिस रिकव्हर करणार आहे. या मोबाईलमध्ये अयाने व्हिडीओ तयार केले होते, हे विशेष.
आता सगळे लक्ष पोलिसांनी आतापर्यंत जप्त केलेल्या मोबाईल, लॅपटॉपमधून काय माहिती मिळते याकडे लागले आहे. त्यातून आणखी धक्कादायक माहिती समोर येईल असा अंदाज वर्तविला जात आहे.
थार वाहन व दोन पिस्टल जप्त
अयान अहमदच्या थार वाहनातील रीलमध्ये दोन पिस्टल दिसत होत्या. ते वाहन व पिस्टल राजेश रोशन प्रजापती रा. सावळी दातुरा, ता. अचलपूर यांच्या मालकीच्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी ते आज जप्त केले. जप्त पिस्टलचा व्यास कमी असल्याचे दिसून येत असल्याने अधिक तपासणीसाठी ते तज्ञांकडे पाठविण्यात आले आहे. रील शूट करताना अयानने वापरलेला मोबाईल एका व्यक्तीला विकला होता. तो मोबाईल सुद्धा घेणार्या व्यक्तीकडून जप्त करण्यात आलेला आहे.