सेलू,
bear-attacks-man : तालुक्यातील सालई (पेवठ) येथे बुधवार २२ रोजी सकाळी ६ वाजता अस्वलीने केलेल्या हल्ल्यात किसना तिळमगाम (५०) रा. सालई पेवठ गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किसना तिळमगाम सकाळी ६ वाजताच्या सुमारास गावाबाहेर प्रात:विधीसाठी गेले होते. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या अस्वलीने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात किसना तिळमगाम गंभीर जखमी झाले. जीवाच्या आकांताने त्यांनी आरडाओरड केल्यानंतर गावकर्यांनी घटनास्थळी धावून आले व मोठ्या धाडसाने त्यांची अस्वलाच्या तावडीतून सुटका केली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमीला तात्काळ सेलू ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी वर्धा येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
सालई (पेवठ) हे गाव जंगलालगत असल्याने येथे वन्यप्राण्यांचा सतत वावर असतो. यापूर्वीही नागरिकांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे गावकर्यांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण असून सालई (पेवठ) गावाचे तातडीने पुनर्वसन करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.