एकनाथ शिंदेंचा एल्गार...२२ जिल्ह्यांमध्ये संपर्क मंत्र्यांची नियुक्ती!

    दिनांक :22-Apr-2026
Total Views |
मुंबई,
Eknath Shinde's Elgar स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आक्रमक तयारीला सुरुवात केली असून संघटन बळकट करण्यासाठी राज्यभर मोठे पाऊल उचलले आहे. पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील बावीस जिल्ह्यांमध्ये नव्या जबाबदाऱ्या वाटप करण्यात आल्या आहेत. प्रत्येक संपर्क मंत्र्यावर दोन जिल्ह्यांची जबाबदारी सोपवून “जिंकणे हाच एकमेव पर्याय” असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.
 
 
Eknath Shinde
 
विदर्भ मजबूत करण्याचे आदेश 
बैठकीत प्रमुख मंत्री आणि पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत विविध मंत्र्यांकडे वेगवेगळ्या जिल्ह्यांची सूत्रे देण्यात आली. जळगाव-नंदुरबार, नाशिक-अहमदनगर, ठाणे-पालघर, नांदेड-हिंगोली, बीड, जालना, अमरावती-अकोला, यवतमाळ-वाशिम, भंडारा-गोंदिया, नागपूर-वर्धा, गडचिरोली-चंद्रपूर तसेच धुळे-बुलढाणा अशा जिल्ह्यांमध्ये संघटन मजबूत करण्याची जबाबदारी नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण जिंकण्यावर भर देत स्थानिक सत्तेवर भगवा फडकवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रत्येक ठिकाणी ठराविक लक्ष्य निश्चित करून नियोजनबद्ध पद्धतीने निवडणूक लढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांची निवड करून त्यांना पूर्ण पाठबळ देण्यावरही विशेष भर देण्यात येणार आहे.
 
यासोबतच ज्या जिल्ह्यांमध्ये इतर पक्षांचे प्रभावी मंत्री आहेत, तिथेही मागे न हटता ताकदीने लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. शासकीय समित्यांमध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांना स्थान मिळवून देण्यासाठीही प्रयत्न तीव्र करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.ही संपूर्ण मोहीम केवळ नियमित कार्यक्रम नसून स्थानिक सत्तेवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आखलेली व्यापक रणनीती असल्याचे स्पष्ट झाले आहे. संघटन, प्रशासन आणि निवडणूक व्यवस्थापन या तिन्ही पातळ्यांवर एकाच वेळी काम करत शिवसेना आगामी निवडणुकांसाठी सज्ज झाली असून या आक्रमक भूमिकेचा निवडणुकांवर किती परिणाम होतो याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.