सरकारचा अलर्ट...राज्यावर एल निनोचे सावट

    दिनांक :22-Apr-2026
Total Views |
मुंबई,
El Nino's impact on the state राज्यात यंदा एल निनोच्या परिणामांमुळे गंभीर हवामान संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जून महिन्यात पावसाची सुरुवात झाल्यानंतर ऑगस्टपर्यंत पावसात खंड पडण्याची चिन्हे दिसत असल्याने राज्य सरकारकडून पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.जलसंपदा विभागाने राज्यातील सर्व महानगरपालिका आणि स्थानिक संस्थांना पाणी जपून वापरण्याचे निर्देश दिले असून ३१ ऑगस्टपर्यंत पाणीसाठ्याचे काटेकोर व्यवस्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
 

maharashtrat el nino 
एल निनोच्या प्रभावामुळे शेती, उद्योग आणि बांधकाम क्षेत्रावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भविष्यात पाणी कपातीची परिस्थिती उद्भवू शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासह काही भागांना पावसाचा इशारा दिला आहे. मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असले तरी मुसळधार पावसाची नोंद झालेली नाही. मात्र वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दुसरीकडे, सांगली जिल्ह्यात मध्यरात्री अचानक झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही भागांत वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला असून शेतामध्ये पाणी साचले आहे. उस आणि आंब्याच्या पिकांना यामुळे मोठा फटका बसला आहे.
 
अवकाळी पावसाचे थैमान
अवकाळी पावसाच्या घटनांमध्ये धाराशिव जिल्ह्यातील विठ्ठलवाडी येथे दुर्दैवी घटना घडली आहे. शेतात काम करत असताना वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. काही दिवसांतच त्यांच्या कुटुंबात विवाह सोहळा होणार होता, मात्र या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.लातूर जिल्ह्यातही अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे काही भागांत गारपीट झाली आहे. जोरदार पावसामुळे जनजीवन काही काळ विस्कळीत झाले. मात्र तापमानात झालेल्या घसरणीमुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यात एकीकडे एल निनोचे संभाव्य संकट आणि दुसरीकडे अवकाळी पावसाचे थैमान यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा चिंतेत सापडला असून आगामी काळात हवामान परिस्थितीवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.