तभा वृत्तसेवा
पांढरकवडा,
tipeshwar-on-may-1st : बुद्ध पौर्णिमेच्या रात्री सर्वच अभयारण्यांत चंद्र प्रकाशात होणारी वन्यप्राणी गणना म्हणजेच निसर्ग अनुभव या वर्षी वन्यजीव प्रेमींना येत्या 1 व 2 मे रोजी याचा अनुभव घेता येणार आहे. टिपेश्वर अभयारण्य अल्पावधीतच लोकप्रिय झाल्याने या ठिकाणीसुद्धा निसर्गप्रेमी निसर्ग अनुभव घेण्यासाठी मागील काही वर्षांपासून मोठ्या संख्येने येत आहेत. बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्या रात्री रात्रभर विविध जलसाठ्यांच्या ठिकाणी उंच मचाणीवर बसून पाणी पिण्यास येणाèया सर्व वन्यप्राण्यांचे वर्णन वेळेनुसार केले जाते. 24 तासांत सर्व ठिकाणच्या नोंदी संकलित करून वन्यप्राणी संख्या काढण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे.
यात वन्यप्राणी संख्या निश्चित काढता येत नसल्याने अनेकदा ही पद्धत बंद करून जंगलात मोठ्या संख्येत स्वयंचलित कॅमेरे लावुन वन्यप्राण्यांचे फोटो काढून संख्या ठरविण्यात यावी अशी मागणी पुढे आली. परंतु पारंपरिक पद्धत पुढेही चालू ठेवण्याचा निर्णय कायम ठेवत यास ‘निसर्ग अनुभव’ असे नाव देण्यात आले.
या उपक्रमामुळेवन्यजीव प्रेमींना दरवर्षी निसर्ग अनुभव घेता येऊ लागला. यासाठी मोठ्या संख्येने वन्यप्रेमी येऊ लागल्याने वनविभागाने काही वर्षांपासून आभासी पद्धतीने नोंदणी सुरू केली आहे. यात शुल्क आकारून लॉटरी पद्धतीने वन्यप्रेमीची निवड करण्यात येते.
दरवर्षी फक्त बुद्ध पौर्णिमेच्या रात्रीच ही जणगणना करण्यात येते. टिपेश्वर अभयारण्यात मुंबई, नागपूर, हैदराबाद, कोलकाता, बंगळुरू या शहरांसह अनेक राज्यांतील वन्यप्रेमी आपली उपस्थिती नोंदवीत असतात. जंगलात अनेक ठिकाणी पाणवठे असतात, नाल्यात, डोहात पिण्यास पाणी उपलब्ध असते अशा सर्वच पाणवठ्यांवर मचाण बांधल्या जात नसल्याने ही प्राणीगणना अचूक होऊच शकत नाही. त्यामुळे मागील काही वर्षांपासून यास निसर्ग अनुभव असे नाव देण्यात आले.
मागीलवर्षी निसर्ग अनुभवात 6 वाघ, 6 अस्वल, 12 रानकुत्रे, 6 सायाळ, 15 सांबर, 173 मोर, 292 रानडुक्कर, 327 चितळ, 129 नीलगायी, 193 माकड, 3 घुबड, 6 ससे, 7 रानमांजर, 4 बिबट असे एकूण 1179 प्राणी नोंदण्यात आले होते. मागील वर्षी फक्त 6 वाघ दिसले तरी या अभयारण्यात 15 ते 20 वाघ असल्याचे वन्यप्रेमींचे म्हणणे आहे.
टिपेश्वर अभयारण्याचे 2023 पासून दोन भाग करण्यात आले आहेत. पाटणबोरी व माथणी असे दोन वनपरिक्षेत्र असून 2 वनपरिक्षेत्र अधिकारी काम पाहतात. सुन्ना, कोद्दोरी व माथणी असे तीन प्रवेशद्वार या अभयारण्यास आहेत. दोन्ही वनक्षेत्र अंतर्गत 36 पाणवठ्यांवर मचाणी निर्माण करण्यात आलेल्या आहेत.