कारंजा लाड,
agricultural-power-supply-shut-down : तालुक्यातील जांब परिसरात ३ एप्रिल रोजी वादळी वार्यासह गारपीट झाली. त्यामुळे विद्युत खांब जमिनीवर कोसळले शिवाय काही ठिकाणी विद्युत तार तुटून पडले परिणामी वीजपुरवठा बंद झाला. विस्कळीत वीजपुरवठ्यामुळे शेती पंप तसेच पाणीपुरवठा यंत्रणांवर परिणाम होऊन पिकांचे नुकसान होत असल्याची तक्रार करत शेतकरी एल्गार समिती, वाशीम जिल्हाच्या वतीने उपविभागीय अभियंता महावितरण कारंजा यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मागील काही दिवसांपासून कृषी खंडित झाला. परिणामी शेतकर्यांच्या पिकांना पाणी देता येत नसल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही समितीच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच तीन दिवसांत समस्या न सोडवल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात येईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर डॉ. रमेश चंदनशिव, नथ्यू हुसेन कामणपाले, मो. साजिद मो. अयुब, आदींच्या स्वाक्षर्या आहेत. शेतकरी एल्गार समितीचे जिल्हा पदाधिकारी राजू अवताडे यांनी संबंधित अधिकार्यांनी तात्काळ दखल घेऊन शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.