रुद्रप्रयाग,
Kedarnath Dham is open पवित्र हिमालयाच्या कुशीत वसलेल्या श्री केदारनाथ धामचे कपात आज अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि विधीवत वैदिक मंत्रोच्चारांच्या गजरात भाविकांसाठी खुले करण्यात आले. यावेळी संपूर्ण मंदिर परिसर भक्तीभावाने न्हाऊन निघाला. या पवित्र प्रसंगी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी उपस्थित होते. त्यांनी दर्शनासाठी आलेल्या सर्व यात्रेकरूंचे स्वागत केले. मंदिराला ५१ क्विंटल फुलांनी सजवण्यात आले होते.
छायाचित्रण तसेच भ्रमणध्वनीवर बंदी
दरम्यान, मंदिर परिसरात पवित्रतेचे पालन करण्यासाठी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारचे चित्रिकरण, छायाचित्रण तसेच भ्रमणध्वनीचा वापर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. तसेच परवानगीशिवाय मानवरहित उड्डाण यंत्रांचा वापर करण्यासही मनाई करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाने भ्रमणध्वनी ठेवण्याची विशेष व्यवस्था केली असून सर्वांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून मंदिराची पवित्रता अबाधित राहील. चारधाम यात्रेच्या सुरुवातीपासूनच केदारनाथ धाममध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळली असून थंड हवामान असूनही भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. प्रशासनाने भाविकांना उबदार कपडे आणि आवश्यक काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.