मतदानाच्या ४८ तास आधी नंदिग्राममध्ये मोठे फेरबदल

पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी बदली

    दिनांक :22-Apr-2026
Total Views |
नंदिग्राम,
Major changes in Nandigram पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदिग्राम मतदारसंघात मतदानापूर्वीच निवडणूक आयोगाने मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मतदान अवघ्या काही तासांवर आले असताना पोलीस प्रशासनात करण्यात आलेल्या या बदलामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला वेग आला आहे. आगामी निवडणुकीत राज्यातील एकूण जागांसाठी मतदान दोन टप्प्यांत पार पडणार असून पहिला टप्पा २३ एप्रिल रोजी आणि दुसरा टप्पा २९ एप्रिल रोजी होणार आहे. त्यानंतर मतमोजणी ४ मे रोजी केली जाणार आहे. पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी नंदिग्रामसारख्या संवेदनशील मतदारसंघात हा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने नंदिग्राममधील विद्यमान पोलीस निरीक्षक हितेश चौधरी यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी अखिलेश सिंह यांची नियुक्ती केली आहे. मतदानापूर्वी अवघ्या दोन दिवसांवर हा बदल करण्यात आल्याने सर्व स्तरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
 
 
Nandigram
या बदलामागे कोणतेही विशिष्ट कारण जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र आयोगाने हा आदेश तातडीने लागू करण्याचे निर्देश दिले असून नवीन अधिकारी यांनी लवकरात लवकर पदभार स्वीकारावा असे स्पष्ट करण्यात आले आहे. नंदिग्राम हा अत्यंत संवेदनशील मतदारसंघ असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असावा. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी आयोगाकडून अधिक कडक देखरेख ठेवली जात असल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, संपूर्ण राज्यात निवडणूक आयोगाने कठोर नियम लागू केले आहेत. दुचाकी वाहनांच्या हालचालींवर बंदी घालण्यात आली असून रॅलींवरही मर्यादा ठेवण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी दुचाकींच्या वापरावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच एका वाहनात दोनपेक्षा जास्त व्यक्तींना प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. या सर्व उपाययोजनांचा उद्देश निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडणे हा असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.