तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
ralegaon-files : राळेगाव शहरासह परिसरातील अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यासंदर्भात ऑडिओ क्लिप पोलिसांना दिली आहे. त्या मुली केवळ आदिवासी समाजातील नसून हिंदू मुली आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड. प्रफुल्ल चौहान यांनी दिली आहे.
अॅड. चौहान पुढे म्हणाले, केवळ राळेगाव तालुकाच नव्हे तर वणी, मारेगाव, कळंब या परिसरातील एकूण 34 मुली बेपत्ता असल्याची आमची माहिती आहे. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये जी मुलगी मुलासोबत बोलत आहे, ती राळेगाव शहरातील रहिवासी आहे.
या मुलीची आई पसार आहे. तिचे ‘लास्ट लोकेशन’ ग्वाल्हेर येथे होते. यानंतर तिचा पत्ता लागला नाही. अल्पवयीन मुलींची विक्री करणारे मोठे सिंडिकेट या परिसरात सक्रिय असल्याने याचा संवेदनशीलतेने तपास केला जावा, अशी आमची अपेक्षा आहे आणि पोलिसांवर आमचा विश्वास असल्याचे, ते म्हणाले.
खानदेश, राजस्थान, गुजरात या भागांत मुली मिळत नसल्याने तिथे पैसे घेऊन मुलींचे लग्न लावून देतात. नंतर काही दिवसांतच हा विवाह संपुष्टात आणला जातो. नवीन नवरा मुलगा शोधला जातो. अशा पद्धतीने गुन्हे करणाèया टोळ्या सक्रिय आहेत. मुली बेपत्ता असलेल्या पालकांकडून फोन आले आहेत, असेही अॅड. चौहान यांनी सांगितले.
आमदाराचा व्हिडिओ व्हायरल
राळेगाव शहर व परिसरातील आदिवासी समाजातील मुली बेपत्ता असल्याचे वृत्त माध्यातून पुढे आल्यानंतर अदिवासी समाजाचे आमदार प्रा. राजू तोडसाम यांची व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी सांगितले आहे, की भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. प्रफुल्ल चौहान यांनी जी भूमिका घेतली आहे त्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्याकडे चौकशी करून वास्तव जाणून घेतले. आदिवासी मुलींबाबतची माहिती चुकीची असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितल्याचे त्यांनी या क्लिपमध्ये म्हणले आहे.