मुरदोलीच्या जंगलात ‘वनराज’ची डरकाळी! VIDEO

- एकासोबत तीन वाघोबाचे दर्शन : व्हिडीओ कॅमेर्‍यात कैद

    दिनांक :22-Apr-2026
Total Views |
प्रमोदकुमार नागनाथे,
गोंदिया, 
murdoli-forest : कधीकाळी प्रादेशिक वन विभागाच्या अख्त्यारीत असलेल्या व प्रशासकीय दृष्ट्या नुकताच नवेगाव- नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये समाविष्ट झालेल्या गोरेगाव वनपरिक्षेत्रातील मुरदोली जंगल शिवारात वाघाचे अधिवास असल्याचे बोलले जात असताना बुधवारी २२ एप्रिल रोजी सकाळी त्यावर शिक्कामोर्तब झाले. येथील वनविभागाच्या नर्सरीला लागून असलेल्या बंड तलाव परिसरात एक, दोन नव्हे तर चक्क तीन वाघांनी एकासोबत दर्शन दिले. यावेळी त्याठिकाणी कामावर असलेल्या मजूरांसह वन कर्मचार्‍यांनाही या वाघोबांची चित्रफिती काढण्याचा मोह आवरता आला नाही.
 
 
k
 
 
 
जिल्ह्यातील बहुतांश वनक्षेत्र नवेगाव-नागझिरा बफर क्षेत्रात येत असला तरी त्याची अंमलबजावणी नुकतीच १ एप्रिलपासून करण्यात आली आहे. त्या दृष्टीने अनेक वनक्षेत्राचा अधिकार आता वन्यजीव विभागाच्या अख्त्यारीत गेलेला आहे. त्यात जिल्ह्यातील प्रादेशिक आणि वन्यजीव जंगलांमधील पोषक वातावरणामुळे वाघांची संख्या वाढत आहे. परिणामी आता नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रासह प्रादेशिक जंगलातही वाघाचे अस्तित्व दिसू लागले आहे. तिरोडा वनपरिक्षेत्रातील प्रादेशिक जंगलात शिकारीच्या शोधात एका वाघाचा शेतशिवारातील विहीरीत पडून मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वीच पुढे आली असताना आता गोरेगाव वनपरिक्षेत्रातील मुरदोली वनक्षेत्रातही वाघाची डरकाळी ऐकू येत आहे. बुधवारी सकाळी मुरदोली गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वन विभागाच्या नर्सरी शेजारी लागून असलेल्या बंड तलावात पाणी पिण्यासाठी चक्क तीन वाघ सोबत आल्याचे तेथील मजूरांसह वन विभागाच्या कर्मचार्‍यांना दिसून आले. यातील काहींनी या वाघांचा व्हिडीओ काढला असून समाज माध्यमांवर सद्या हा व्हिडीओ फिरत आहे. या घटनेवरून जिल्ह्यात चौफेर वाघोबाचे अस्तित्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
 
 
 
मानवी हस्तक्षेपावर हवी बंदी
 
 
जिल्ह्यात चौफेर वाघाचा अधिवास असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. आपल्या गावशेजारी वाघांचा अधिवास असल्याची जाणीव आता प्रत्येकाला असणे गरजेचे आहे. वाघाच्या स्वातंत्र्यात बाधा पोहचू नये, यासाठी जंगलात मानवी हस्तक्षेपावर पूर्णतः बंदी घालणे गरजे असल्याचे मत वन्यजीवप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
 
 
कॅरीडोर सक्षम करण्याची गरज...
 
 
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पासह गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील जंगल मध्य भारतातील व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा दुवा आहे. नागझिरा ते पेंच, नागझिरा-नवेगाव-ताडोबा, नागझिरा - उमरेड, पवनी, कर्‍हांडला असा एक कॅरिडोर आहे. मात्र, जंगलात होणारे अतिक्रमण व इतर कारणांनी वाघांच्या भ्रमणमार्गांमध्ये अनेक अडथळे येत असल्याचे नेहमीच दिसून आले आहे. यासाठी कॅरीडोर अधिक सक्षम करण्याची गरज आहे.