नागपूर,
national-health-care-institute : नॅशनल हेल्थ केअर इन्स्टिट्यूट हे 450 बेड्सचे मल्टी-स्पेशालिटी व सुपर-स्पेशालिटी रुग्णालय उत्तर अंबाझरी रोडवरील खसरा क्रमांक 4 येथे उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन शुक्रवारी 24 एप्रिलरोजी दुपारी 3.30 वाजता रा.स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख्याने उपस्थित राहतील.
नागपूर आणि मध्य भारतातील रुग्णांना आता गंभीर आजारांच्या निदान व उपचारासाठी भटकंती लागणार नाही. शहरात लवकरच अत्याधुनिक, सर्वसमावेशक मल्टी-स्पेशालिटी व सुपर-स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार असून, सर्व निदान व उपचार सुविधा एकाच छताखाली उपलब्ध असतील.
नागपुरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट स्थापन करणाऱ्या डॉ. आबाजी थत्ते सेवा व अनुसंधान संस्थेने नागपूरचा आणखी एक मोठा सार्वजनिक आरोग्य प्रकल्प हाती घेतला आहे. सुमारे 5 लाख चौ. फूट क्षेत्रफळ असलेले हे रुग्णालय नोंदणीकृत धर्मादाय संस्थेद्वारे चालवले जाणारे पहिले असेल ज्याची रचना कॉर्पोरेटसारखी असेल व सर्वांना परवडणाèया दरात उपचार उपलब्ध असतील.
नागपूर शहर, परिसर व मध्य भारतातील शेजारील राज्यांच्या गरजा लक्षात घेऊन या रुग्णालयाची संकल्पना मांडण्यात आली आहे. प्रस्तावित एनएचसीआय हे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा असलेले असेल व येथे अत्याधुनिक निदान व उपचार उपकरणे, उच्च कौशल्य असलेले सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर व सहाय्यक कर्मचारी उपलब्ध असतील.
नागपुरात वेलनेस व हेल्थ केअरची सँक्चुअरी तयार करणार आहोत, अशी माहिती संस्थेचे सरचिटणीस शैलेश जोगळेकर यांनी दिली. विविध आजारांचा विचार करून एनएचसीआयमध्ये बहुविषयक दृष्टिकोन व बहुपद्धती उपचार यावर भर दिला जाईल, ज्यामध्ये अत्याधुनिक निदान सुविधांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाईल. अवयव प्रत्यारोपणासाठी स्वतंत्र सुविधा निर्माण करण्यावर विशेष भर दिला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
सिंगापूरस्थित एचकेस एशिया पॅसिफिक डिझाईन कन्स्लटिंग पीटीए हे संकल्पना डिझाईन आर्किटेक्ट आणि वैद्यकीय नियोजन सल्लागार आहेत. मुंबईस्थित मेसर्स जेजे कन्स्लटंट्स हे प्रमुख वास्तुविशारद आहेत. टाटा कन्स्लटिंग इंजिनियर्स हे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आहेत.