हिंगणघाट,
sameer-kunawar : सर्व पांदण रस्त्यांबाबत तातडीने निर्णय घेऊन प्रत्यक्ष कामांना सुरूवात करा. सर्व शेत पांदण रस्त्यांची अद्ययावत, वस्तुनिष्ठ व प्राधान्यक्रमानुसार यादी तात्काळ सादर करण्याचे निर्देश आ. समीर कुणावार यांनी दिले.
स्थानिक उपविभागीय कार्यालयात मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदण रस्ते योजना संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे, विधानसभा क्षेत्रनिहाय समितीचे सचिव आकाश अवतारे, पोलिस निरीक्षक अनिल राऊत, तहसीलदार योगेश शिंदे, तहसीलदार कपिल हटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत धमाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली भलावी, निलेश गावंडे, मिनल तुरखडे तसेच समिती सदस्य संजय डेहने, विनोद विटाळे, वामन चंदनखेडे, किशोर शेंडे, नितीन वाघ आदी उपस्थित होते.
आ. कुणावार पुढे म्हणाले की, शेतरस्त्यांवरील अतिक्रमणं हटवून ते बारमाही वापरासाठी सक्षम करणे, शेतमालाची वाहतूक सुलभ करणे आणि उत्पादन खर्चात बचत घडवून आणणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून ग्रामीण पायाभूत सुविधांना बळकटी मिळून शेतकर्यांच्या उत्पन्नवाढीस चालना मिळणार आहे. महसूल व वन विभागाने १५ एप्रिल रोजी जारी केलेल्या शुद्धीपत्रकामुळे योजनेच्या अंमलबजावणीत येणारे तांत्रिक अडथळे दूर होऊन कामांना अधिक गती मिळणार आहे. शेतकर्यांना वर्षभर शेतात सहज पोहोचता यावे आणि शेतमालाची वाहतूक सुलभ व्हावी, या उद्देशाने आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्त्वाखाली ही योजना राज्यभर प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
रस्ते बांधकामासाठी लागणार्या मुरूम, दगड व मातीवर कोणतेही स्वामित्व धन (रॉयल्टी) आकारले जाणार नसल्याने शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. बैठकीदरम्यान आ. कुणावार यांनी कामांमध्ये पारदर्शकता, गुणवत्ता व वेळेचे काटेकोर पालन करण्यावर विशेष भर दिला. प्रत्येक गावातील प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन प्राधान्यक्रम ठरवावा आणि कोणतीही अडचण प्रलंबित न ठेवता तत्काळ निराकरण करावे, असे निर्देश त्यांनी अधिकार्यांना दिले. शेतकरीहिताला सर्वोच्च प्राधान्य देत ही योजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार यावेळी व्यत करण्यात आला.