वर्धा,
pankaj-bhoyar : सहकाराने समृद्धीचा मार्ग प्रशस्त होतो हे जरी खरे असले तरी सहकार क्षेत्रात निष्ठेने, समर्पणाने आणि प्रमाणिक पणे कार्य केल्याशिवाय आपण समृद्धीचे शिखर गाठू शकत नाही. कार्यकर्त्यांना आणि कर्मचार्यांना सहकार कायद्याचे ज्ञान आणि कामाची जान असणे गरजेचे आहे. यासाठी नियमित कार्यशाळा आणि प्रशिक्षण वर्ग घेणे आवश्यक आहे. यासाठी आपले जिल्ह्यात अद्यावत तंत्रज्ञानाच्या सोई आणि सुविधा असलेले सहकार भवन उभारण्यात येत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
वर्धा जिल्हा कर्मचारी सहकारी पत संस्थाचा संघ मर्या. वर्धा यांच्या वतीने स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूलचे सभागृहात आयोजित सहकार परिषदेचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सुधाकर घवघवे होते. तर वता म्हणून विवेक जुगादे उपस्थित होते. प्रमुख अतिथी जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, सुधाकर साटोणे, मिलिंद देशपांडे, विनोद भीमनवार यांची उपस्थिती होती.
ना. भोयर पुढे म्हणाले की, वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्यंतरी डबघाईस आली होती. शासनाने ६० कोटी रुपयाचा भरघोस निधी उपलब्ध करून ही बँक आर्थिक दृष्ट्या सुरळीत करण्याची जबाबदारी घेतलेली आहे. या बँकेकडे असलेले सर्व शासकीय व निमशासकीय खाते वर्ग करण्याची प्रकीया सुरू आहे. त्यामुळे इतर सर्व पतसंस्थांनी त्यांच्या आर्थिक व्यवहाराबाबत काळजी करू नये असे ते म्हणाले.
यावेळी विवेक जुगादे यांनी सहकार चळवळीत युवकांनी पुढाकार घेवून ही चळवळ अधिक व्यापक आणि प्रबळ बनवावी, असे त्यांनी या प्रसंगी नमूद केले. सहकार कायदा अधिक प्रभावी व्हावा यासाठी शासन नवीन धोरण ठरवित असून अद्यावत नवीन कायदा लवकरच अस्तीत्वात येईल. मात्र त्या अगोदर आपण सर्वांनी एकत्रितपणे सहकार खात्याशी चर्चा आणि विचार विनिमय केल्यास पतसंस्थांना पोषक ठरणारे आवश्यक धोरण कसे असावे याची दिशा आपल्याला निश्चित करता येईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री डॉ. भोयर यांचा पगारदार पतसंस्थांचा संघाचे संस्थापक अध्यक्ष ओंकार धावडे, विद्यमान अध्यक्ष प्रशांत भोयर यांनी सत्कार केला.
प्रास्ताविक ओंकार धावडे यांनी केले. संचालन विलास सोनारकर तर आभार प्रशांत भोयर यांनी मानले. यशस्वीतेसाठी नंदकुमार वरकड, नितीन तराळे, रूपेश नागरे, चंद्रकांत ठाकरे, राजू राजूरकर, दिलीप उपासे, राजेश राऊत, सीमा मोकदम, मीनाक्षी धोपटे यांनी सहकार्य केले.