पिंपळखुटा गावात वाजतो ‘अभ्यासाचा भोंगा’

अनोख्या उपक्रमाची शासन दखल घेणार का?

    दिनांक :22-Apr-2026
Total Views |
तुषार अकर्ते
वरूड, 
pipalkhuta-study-activities : मोबाईल व इंटरनेटच्या युगात पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन आबालवृद्धांना मोबाईलचे वेड लागले आहे. त्यामुळे अंतर्गत संवाद काळाच्या पडद्याआड झाला आहे. यामुळे शैक्षणिक अवकळा आल्याचे चित्र पाहून तालुक्यातील पिंपळखुटा ग्रामपंचायत सदस्यांनी व ग्रामस्थांनी एकमताने एक क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. गावातील टीव्ही संच आणि मोबाइल यंत्र रात्री ७ ते ९ यावेळेत बंद ठेऊन शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याच्या उद्देशाने ’अभ्यासाचा भोंगा’ हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे.
 
 
pipalkhuta-study-activities
 
 
 
गावातील विद्यार्थ्यांनी याकाळात अभ्यासाचा ध्यास घेतल्याने सुसंस्कारित पिढी निर्माणा होण्यास मदत होणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाची राज्यभर चर्चा असताना शासन दखल घेणार का ? अशी चर्चा आहे. डिजिटल युगात मोबाईल आणि टीव्हीच्या अतिवापरामुळे मुलांचे अभ्यासाकडे होणारे दुर्लक्ष रोखण्यासाठी तालुक्यातील पिंपळखुटा ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून आणि सरपंचांच्या संकल्पनेतून ’अभ्यासाचा भोंगा’ हा अनोखा उपक्रम सुरू झाला. यामध्ये रात्री ७ ते ९ या काळात गावातील टीव्ही, मोबाईल बंद ठेऊन आपल्या मुलांना वाचन, अभ्यास करायला बसविणे आणि यातून सुसंस्कारित पिढी घडविणे हा उद्देश आहे. सुरू झालेल्या या उपक्रमाला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे या दोन तासांच्या कालावधीत केवळ विद्यार्थीच नव्हे, तर पालकही मोबाईलपासून दूर राहतात. विद्युत खांबावर भोंगा आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून, कॅमेर्‍यात गावाची सुरक्षा तर भोंग्यांमध्ये नियमित सात वाजता सायरन वाजवून टीव्ही, मोबाईल बंद करून अभ्यासाला लागण्याच्या सूचना दिल्या जाते. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि सुजान नागरिक गावाची गस्त घालतात. त्यामुळे घराघरात अभ्यासाचे वातावरण तयार होत असून मुलांमध्ये शिस्त आणि एकाग्रता वाढताना दिसत आहे.
 
 
आजच्या काळात मुले मोबाईलच्या आहारी जात असताना, पिंपळखुटा गावाने घेतलेला हा वसा डिजिटल व्यसनाविरुद्धचा लढा ठरत आहे. या उपक्रमामुळे पुन्हा चौका चौकातील ओट्यावर वृद्धाच्या बैठका आणि सुख-दुःखाची देवाणघेवाण सुरू झाल्याने एकंदरीत गावातील वातावरण बदलून गेल्याने सामाजिक भावना जागृत झाल्या आहे.
 
 
शैक्षणिक पाया मजबूत करण्याचा प्रयत्न
 
 
‘अभ्यासाचा भोंगा’ उपक्रम इतर गावांनीही राबवला, तर शैक्षणिक दर्जा निश्चितच उंचावणार आहे. मोबाईल, टीव्हीला बाजूला ठेऊन ज्ञानाला प्राधान्य देणे, तसेच देशाच्या विकासाला हातभार लावणारी ज्ञानवंत पिढी घडविण्याचा ध्यास आम्ही घेतला असून गावातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत करण्याचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया पिंपळखुटा येथील सरपंच गजानन पडोळे यांनी दिली आहे.