उमरखेडच्या ‘त्या’ पेट्रोल पंपाला दिलासा

लीज 5 वर्षांसाठी वाढविण्याचा आदेश

    दिनांक :22-Apr-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
उमरखेड, 
umarkheed-petrol-pump : अनेक वर्षांपासून वादात अडकलेल्या उमरखेड येथील भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपाबाबत अखेर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, जिल्हाधिकारी विकास मीना यांनी पुरुषोत्तम अँड कंपनी या डीलरला संबंधित जागेची लीज पुढील पाच वर्षांसाठी वाढवून देण्याचा आदेश जारी केला आहे.
 

y22Apr-Petrol-Pump 
 
 
 
यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रकरणाला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकाèयांच्या आदेशानुसार, उमरखेड नगर परिषद जवळील पेट्रोल पंपाची ही जागा भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनला दिलेली आहे. त्या जागेवरील लीज मुदत संपल्यानंतरही विविध न्यायालयीन व प्रशासकीय प्रक्रियांमुळे प्रकरण रखडले होते.
 
 
या दरम्यान उच्च न्यायालय, महसूल विभाग तसेच स्थानिक प्रशासन यांच्याकडून विविध आदेश, स्थगिती आणि सुनावण्या झाल्या. वादाचा दीर्घ इतिहास या प्रकरणात जमीन मालकी, भाडेपट्टा अटी, महसूल कायदे तसेच सार्वजनिक हित या मुद्यांवरून वाद निर्माण झाला होता.
 
 
विशेषतः महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अंतर्गत अधिकारांचा वापर, तसेच पेट्रोलियम संबंधित नियमांनुसार लीज नूतनीकरणाची प्रक्रिया यावर अनेकदा प्रश्न उपस्थित झाले. काही निर्णयांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले होते. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगर परिषद तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अहवालांच्या आधारे जिल्हाधिकाèयांनी सविस्तर पडताळणी केली.
 
 
या अहवालांमध्ये पेट्रोल पंपाचे मध्यवर्ती स्थान, नागरिकांची गरज, वाहतुकीची सोय आणि पर्यायी जागेचा अभाव यांचा विचार करण्यात आला. तसेच, संबंधित डीलरने आवश्यक कागदपत्रे, शुल्क आणि नियमांची पूर्तता केल्याचे नमूद करण्यात आले आहे. यानंतरच लीज नूतनीकरणास मान्यता देण्यात आली आहे.
पाच वर्षांसाठी लीज वाढविली
 
 
आदेशानुसार, पुरुषोत्तम अँड कंपनीला 2025 ते 2030 या कालावधीसाठी (5 वर्षे) लीज नूतनीकरण मंजूर करण्यात आले आहे. या कालावधीत सर्व अटी व शर्तींचे पालन करणे बंधनकारक राहणार असून, कोणतीही अट भंग झाल्यास प्रशासनाला कारवाईचा अधिकार राहील.