सुधारित निवृत्ती वेतन योजनेसाठी महसूल कर्मचार्‍यांचा बेमुदत संप

    दिनांक :22-Apr-2026
Total Views |
आलापल्ली, 
revised-pension-scheme : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना तालुका शाखा अहेरी यांच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी 21 एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार अहेरी यांच्यामार्फत जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात आले आहे.
 

K 
 
 
सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतची विस्तृत अधिसूचना तात्काळ जारी करणे, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कर्मचार्‍यांच्या इतर रास्त मागण्यांची त्वरित पूर्तता करणे, जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सकारात्मक पावले उचलणे अशा मागण्या आहेत.
 
 
राजव्यापी आंदोलनास पाठिंबा देत असून राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य व सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समिती यांनी केलेल्या आवाहनानुसार हे आंदोलन पुकारले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचारी संघटनांना या संपामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून, अहेरी तालुका महसूल कर्मचारी संघटनेने आजपासून प्रत्यक्ष संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
कामाकाजावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसून या बेमुदत संपामुळे तहसील कार्यालय आणि महसूल विभागाशी संबंधित इतर शासकीय कामे ठप्प होण्याची शक्यता आहे. कर्मचार्‍यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून, सरकार यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.