मुंबई,
Ritesh-Jinelia are the new faces of ST महाराष्ट्राच्या राज्य परिवहन महामंडळाला नव्या रूपात सादर करण्यासाठी आता प्रसिद्ध कलाकारांची साथ मिळणार आहे. ‘लालपरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सेवेच्या प्रचारासाठी अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतुकीकडे प्रवाशांचा ओढा वाढवणे आणि एसटीची प्रतिमा अधिक आकर्षक बनवणे हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक लवकरच या दोघांसोबत अधिकृत करार करणार असून हा करार पुढील पाच वर्षांसाठी असणार आहे. या कालावधीत रितेश आणि जिनिलिया विविध जाहिराती, जनजागृती मोहिमा आणि सामाजिक उपक्रमांमधून एसटीचा प्रचार करताना दिसतील. ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रवाशांपर्यंत सेवा प्रभावीपणे पोहोचवण्याचा यामागे प्रयत्न आहे.
याआधीही एसटी महामंडळाने लोकप्रिय कलाकारांना आपल्या प्रचारासाठी पुढे केले होते. मकरंद अनासपुरे आणि दिवंगत विक्रम गोखले यांनी ही जबाबदारी सांभाळत एसटीला वेगळी ओळख मिळवून दिली होती. आता नव्या पिढीत लोकप्रिय असलेल्या या जोडीच्या माध्यमातून अधिक तरुणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. या निर्णयाची चर्चा सामाजिक माध्यमांवरही रंगली असून चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.दरम्यान, रितेश आणि जिनिलिया यांच्या वैयक्तिक आयुष्यातही एक महत्त्वाची घडामोड घडत आहे. ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाच्या निमित्ताने दोघेही एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असून चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनाची धुरा देखील त्यांनीच सांभाळली आहे. जिनिलिया सईबाईंची भूमिका साकारताना दिसणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटातून त्यांच्या धाकट्या मुलाचाही अभिनय क्षेत्रात प्रवेश होणार असल्याने हा चित्रपट त्यांच्या कुटुंबासाठी आणखी खास ठरत आहे.