वर्धा,
second-day-of-strike : जुन्या पेन्शनसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी-निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी २१ पासून बेमुदत संप पुकारला. या आंदोलनाच्या दुसर्या दिवशीही आंदोलनकर्त्यांनी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात धरणे दिले. संपात मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाल्याने विविध कार्यालयांतील कामकाज प्रभावित झाले असून कार्यालयेही ओस पडू लागली आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अधिसूचना तात्काळ जारी करण्यात यावी, टीईटी पात्रता परीक्षा सरसकट सर्व शिक्षकांवर लादू नये, चतुर्थ श्रेणी व वाहन चालक भरतीवरील बंदी उठवावी, कंत्राटी कर्मचार्यांच्या सेवा नियमित करण्यात याव्या, सर्वांसाठी व्यापक आरोग्य विमा लागू करण्यात यावा, आदी मागण्यांसाठी राज्य कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्त्वात हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील हजारो कर्मचारी संपात सहभागी झाल्याने कार्यालयीन कामकाजासाठी आलेल्या नागरिकांना आल्यापावलीच परत जावे लागत आहे.