सिंदेवाही,
skeleton-found-in-the-forest : गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या एका महिलेचा सांगाडा पळसगाव वनपरिक्षेत्रातील घनदाट जंगलात सोमवारी आढळून आला. मृत महिलेचे नाव बहिणाबाई भाऊराव कुमरे (70, रा. सिरकाडा) असे आहे. ते अवशेष बहिणाबाई कुमरे यांचेच असावेत, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
सिंदेवाही तालुक्यातील बहिणाबाई कुमरे या 15 डिसेंबर 2025 रोजी सिरकाडा येथून आपल्या मुलीच्या गावी पुरकेपार येथे जाण्यासाठी पायदळ निघाल्या होत्या. सिरकाडा ते पुरकेपार हे अंतर जंगलातून कापल्यास कमी पडते. त्यामुळे बहिणाबाई नेहमी याच जंगलमार्गाचा वापर करायच्या. मात्र, त्या दिवशी त्या मुलीच्या घरी पोहोचल्याच नाहीत. त्या काहीशा विसरभोळ्या असल्याने सुरुवातीला त्या इकडे-तिकडे गेल्या असाव्यात, असा अंदाज बांधण्यात आला. परंतु, सर्वत्र शोध घेऊनही त्या मिळाल्या नाही. त्यामुळे 18 डिसेंबर 2025 रोजी त्यांची मुलगी गोपिका नामदेव धुर्वे यांनी सिंदेवाही पोलिस ठाण्यात आई बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत वनविभाग आणि पोलिस पाटील यांच्या मदतीने सिरकाडा ते पुरकेपारदरम्यानच्या घनदाट जंगलात शोधमोहीम राबवली होती. परंतु, हा परिसर ताडोबा बफर झोनमध्ये येतो. जंगल घनदाट असल्याने पोलिसांना यश आले नाही. दरम्यान, सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास सिरकाडा येथील काही नागरिक मोहफुले वेचण्यासाठी जंगलात गेले. तेव्हा त्यांना मानवी हाडांचे अवशेष आणि एक साडी पडलेली दिसली. त्यांनी तातडीने ही माहिती पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. ओळख पटवण्यासाठी बहिणाबाईंचा मुलगा देवेंद्र कुमरे यांना पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळावरील साडी पाहून देवेंद्र यांनी ती आपल्या आईचीच असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पोलिसांनी हे अवशेष बहिणाबाईंचेच असल्याचे प्राथमिक निष्कर्षात म्हटले आहे. हा भाग पळसगाव वनपरिक्षेत्रात येत असल्याने वनविभागाच्या अधिकार्यांनीही घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.
रहस्य कायम
बहिणाबाईचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला की त्यांनी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात आपला जीव गमावला, याचे रहस्य अद्याप कायम आहे. हाडांचे अवशेष पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृत्यूचे नेमके कारण तपासणी आणि त्यानंतर होणार्या डीएनए चाचणीच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. सध्या याप्रकरणी देवेंद्र कुमरे यांच्या तोंडी तक्रारीवरून सिंदेवाही पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक कांचन पांडे करीत आहे.