कारंजा लाड,
burst-water-pipe : तालुक्यातील धनज कारंजा या मुख्य मार्गावरील पाणीपुरवठा योजनेतील गंभीर त्रुटींमुळे भामदेवी परिसरात नागरिकांचे जीवन अक्षरशः धोयात आले आहे. सरकारी विहिरीतून सुरू झालेल्या या पाणीपुरवठा योजनेत अवघ्या आठ दिवसांतच मोठे लिकेज निर्माण झाले होते. मात्र, या समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाने तब्बल दोन ते अडीच वर्षे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा संतप्त आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

या सततच्या लिकेजमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून खड्डे निर्माण झाले आहेत. परिणामी, त्या खड्ड्यात बस व ट्रकसारख्या जड वाहनांचे टायर अडकण्याच्या घटना घडत असून, दररोज दोन ते तीन दुचाकीस्वार अपघातग्रस्त होत आहेत. तरीही ग्रामपंचायत संबंधित अधिकार्यांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, रस्त्यावर साचलेले दूषित पाणी पुन्हा त्याच पाइपलाइनमधून विहिरीत मिसळून नागरिकांना पिण्यासाठी पुरवले जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे संपूर्ण गावाच्या आरोग्यावर मोठा धोका निर्माण झाला असून, संसर्गजन्य आजारांचा फैलाव होण्याची भीती व्यक्त होत आहे. शिवाय, दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याने शासनाच्या निधीचाही मोठ्या प्रमाणात अपहार होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
ग्रामस्थांनी यासंदर्भात अनेक वेळा सरपंच, ग्रामसेवक आणि सचिव यांना निवेदने देऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, सत्ताधार्यांचा कार्यकाळ संपत आला असतानाही या ज्वलंत प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचा संताप आता टोकाला पोहोचला आहे. परिणामी सत्ता आहे, पण जबाबदारी नाही का? असा संतप्त सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी संबंधित विभागाने तातडीने हस्तक्षेप करून लिकेजची समस्या कायमची सोडवावी, अशी मागणी केली आहे.तसेच, हा जीवघेणा प्रश्न आणखी किती दिवस सहन करायचा, असा थेट सवालही ग्रामस्थांनी दिला असून, लवकरात लवकर ठोस उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.