अंजनगाव सुर्जी,
birthplace-of-sant-gadge-baba : वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांचे जन्मगाव शेंडगाव आज विविध समस्यांनी ग्रासले असून, विशेषतः या गावाकडे जाणार्या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाल्याचे चित्र समोर आले आहे. स्वच्छतेचा संदेश देणार्या या महान संताच्या गावासाठी मोठा विकास आराखडा जाहीर करून निधी खर्च करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात मूलभूत सुविधांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
अंजनगाव सुर्जी येथून शेंडगावकडे जाणारा प्रमुख मार्ग जागोजागी उखडलेला असून, मोठमोठे खड्डे पडल्याने हा रस्ता प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. वाहनचालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करत वाहन चालवावे लागत आहे, तर पायदळ चालणेही कठीण झाले आहे.
या मार्गावरून शेंडगाव, पिंपळगाव, कापुसतळणी, टाकरखेडा, कोकर्डा, डोंबाळा, रामपुरा, कोतेगाव आदी गावातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात. कापुसतळणी येथील निर्मला व संजीवनी विद्यालयात जाणार्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना विशेषतः पावसाळ्यात मोठा त्रास सहन करावा लागतो.
दरम्यान, या मार्गावर धावणार्या एसटी बसेसही वारंवार खड्ड्यांमुळे बंद पडत आहेत. टायर पंक्चर होणे, इंजिन बिघाड, वाहनांची तुटफूट अशा समस्या निर्माण होत असून, प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशा वेळी चालक व वाहकांनाही प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे, पिंपळगाव ते कापुसतळणी दरम्यान एका नाल्यावर सुरू असलेले पुलाचे बांधकाम २०२५ च्या पावसाळ्यापासून अर्धवट अवस्थेतच पडून आहे. आजपर्यंत या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आलेली नाही. राजकीय नेते व अधिकारी या भागाला भेट देऊन केवळ फोटोसेशन करून निघून जातात, मात्र प्रत्यक्ष समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर आश्वासनांचा पाऊस पडतो, मात्र रस्त्याच्या कामाबाबत ठोस कार्यवाही होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
आंदोलनाचा दिला इशारा
या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती व अपूर्ण पुलाचे काम पूर्ण करावे, अन्यथा नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा विविध सामाजिक संघटनांनी दिला आहे.