वर्धा,
world-book-day : इंटरनेटच्या मायाजालातून विद्यार्थ्यांना व समाजाला एका लिकवर पाहिजे ती माहिती मिळते. पण, मूलभूत ज्ञान मात्र मिळत नाही. विद्यार्थ्यांपर्यंत हे ज्ञान पोहोचवण्यासाठी व वाचनाची आवड रुजविण्यासाठी येथील सचिन सावकर यांच्या नेतृत्वात विदर्भातील काही संवेदनशील तरुण मंडळींनी पुस्तक दोस्ती अभियान सुरू केले.
मरगळलेल्या वाचन संस्कृतीला जिवंत करण्यासाठी प्रत्यक्ष धडपडणारे सेवाव्रती असणारे वर्धेचे सचिन सावरकर मागील १० वर्षांपासून काही समविचारी संवेदनशील मित्रांच्या सहकार्याने विदर्भातील कित्येक गावातील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावण्याची किमया पुस्तक दोस्ती अभियानाने करून दाखविली आहे. सन १९७० ते १९९० पर्यंत बुक स्टॉलवर भरगच्च पुस्तके असायची. वाचनालयात वाचक विद्यार्थी जायचे. या काळात ‘जिथे जिथे दिसते पुस्तक तिथे व्हावे नतमस्तक’ या वचनाप्रमाणे तरुणांपासून वृद्धांपर्यंत पुस्तके विकत घेऊन वाचत होती. १९९० नंतर मात्र चित्र बदलले. तरुणांच्या हातात मोबाईल येऊ लागले. हळूहळू घरातल्या प्रत्येकाकडे हा मोबाईल आला. पुस्तक प्रिय अभिरुची संपन्न समाजाची अक्षरशः अधोगतीकडे वाटचाल सुरू झाली. मरणासन्न अवस्थेला आलेल्या वाचन संस्कृतीला ऊर्जा देण्याचे अत्यंत जिकरीचे काम प्रा. सचिन सावरकर व त्यांचे सहकारी अविरत व अखंडपणे विदर्भातल्या गावागावात करीत आहेत.
प्रत्येक रविवारला याप्रमाणे महिन्यातून चार शिबिरे आयोजित केली जातात. प्रत्येक शिबिरात १० ते २० या वयोगटातील सुमारे ७० ते ८० मुले-मुली सहभागी होतात. या शिबिरांच्या माध्यमातून प्रामुख्याने ग्रामीण तसेच शहरी भागातील मुला-मुलींना या पुस्तक दोस्ती शिबिराचा फायदा होतो. विद्यार्थ्यांना नि:शुल्क पुस्तके देण्यासाठी पदरचे पैसे खर्च करून तर काही पुस्तके वाचकांना व प्रकाशकांना विनंती करून लोकसहभागातून संकलित केली जातात.
या अभियानाला सामाजिक दायित्वाच्या भावनेतून अकोल्याचे संदीप बाजरे, चंद्रपूरचे सुनील बोराटे, यवतमाळचे सुहास लुतडे, अमोल पाळेकर, नागपूरचे महिंद्र वंजारी, भंडार्याचे प्रशिल भुरे, गडचिरोलीचे कवी चुडाराम बल्लारपुरे, विवेक महाजन, शैलेश जाधव, उमेश कापकर, प्राजता लोखंडे, शीतल सावरकर तसेच रचनात्मक कार्य करणारी मंडळी सहकार्य करीत आहे.