उद्धव ठाकरे यांनी धनगर समाजाला उमेदवारी द्यावी

-शिवसेनाप्रमुखांनी दिलेले वचन पाळावे -विदर्भ धनगर परिषदेची मागणी

    दिनांक :22-Apr-2026
Total Views |
अमरावती, 
uddhav-thackeray   : विधान परिषदेची १२ मे रोजी निवडणूक होत असून या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी विदर्भातील धनगर समाजाला उमेदवारी द्यावी आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी लक्ष्मणराव एडतकरांना दिलेले वचन पाळावे, अशी मागणी विदर्भ धनगर परिषदेच्या बैठकीतून धनगर समाजाने केली आहे.
 

jkl 
 
 
 
धनगर समाजाची विदर्भस्तरीय बैठक माजी आमदार हरिभाऊ भदे यांच्या अध्यक्षतेत पार पडली. या बैठकीत राजकीय मंथन करण्यात आले. १९९० मध्ये शिवसेना आमदार व जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेतर्फे वाशीम लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविलेल्या लक्ष्मणराव एडतकर यांना विधान परिषदेत पाठवून धनगर समाजाला प्रतिनिधीत्व देण्यात येईल, असे घोषीत केले होते. बाळासाहेबांनी केलेल्या त्या घोषणेची दुर्देवाने तेव्हा अंमलबजावणी होऊ शकली नाही. परंतु, आता बाळासाहेब ठाकरे यांचे ते वचन माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, दिलीप लक्ष्मणराव एडतकर यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन पूर्ण करावे, अशी विनंती उपरोक्त बैठकद्वारे धनगर समाज बांधवांनी केली.
 
 
 
बैठकीला डॉ. प्रमोद पातुर्डे, काशीराम साबळे (अकोट), भास्करराव ढेवले, संतोष साव, रमेश पाटील (नागपूर), गणेश पावडे (नागपूर), अरुण बांबल, हरिदास भदे (अकोला), जनार्दन पातुर्डे, उत्तमराव गोंडसे (तिवसा), डॉ. रमेश महानुर (यवतमाळ), डॉ. मेघश्याम करडे, प्रमोद तालन, दिगांबर करडे, ओंकार उंदरे (धामणगाव रेल्वे), प्रकाश वाढे, लक्ष्मण उघडे, भाऊराव गाढवे (धामणगाव रेल्वे), शिवदास कोल्हे, मनोज कचरे, अनिल कोल्हे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
 
धनगर समाजाला उमेदवारी द्या
 
 
महाविकास आघाडीने विदर्भाला प्रतिनिधित्व द्यायला पाहिजे. काँग्रेसचा उमेदवार म्हणून महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आणि प्रभारी तसेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेतेमंडळीकडे विधानपरिषदेची उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज केलेला आहे. त्यावर त्यांनी विचार करावा, एकच जागा असल्यामुळे ती शिवसेनेकडे आहे, असे कळते. पण त्या जागेवर उद्धव ठाकरे उभे राहणार नसतील तर ती जागा काँग्रेसकडे जाईल आणि काँग्रेसने ती जागा विदर्भातल्या धनगर समाजाला द्यावी, अशी मागणी आहे.
-अ‍ॅड. दिलीप एडतकर
माजी प्रदेश सरचिटणीस काँग्रेस
 
 
शिंदे यांच्याकडे प्रस्ताव मांडणार
 
 
उद्धव ठाकरे यांच्यासाठी ती जागा सुटली नाही तर महाविकास आघाडीची ती एक जागा काँग्रेसकडे नक्कीच जाईल. अ‍ॅड. एडतकर यांचे काँग्रेसमध्ये जे कार्य आहे, त्यानुसार विदर्भातून त्यांना ही जागा मिळावी, ही संपूर्ण विदर्भातील धनगर समाजबांधवांची मागणी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला शब्द उद्धव ठाकरे पाळणार नसतील तर शिवसेना जिल्हा समन्वयक म्हणून बाळासाहेबांचा शब्द पाळणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्याकडे हा प्रस्ताव नक्कीच मांडणार.
-अरुण पडोळे
जिल्हा समन्वयक, शिवसेना (शिंदे)