मानोरा,
womens-ghagar-morcha : तालुक्यातील गादेगाव या गावातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने माजी सरपंचांच्या नेतृत्वात नागरिकांनी गादेगाव ग्रामपंचायतच्या निष्क्रिय प्रशासन आणि पदाधिकार्यांच्या विरोधात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी घागर मोर्चा काढला.
महिला आणि पुरुष ग्रापं कार्यालयासमोर रिकाम्या घागरी डोयावर घेऊन आले होते. उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, गावातील नळांना आठवडाभर पाणी येत नसल्याने महिलांना दूरच्या विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. यामुळे महिला आणि लहान मुलांचे हाल होत आहेत. गावात पिण्याच्या पाण्याची योजना आहे. पण पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे अनेकदा तक्रार करूनही कोणीही दखल घेत नाही, असे आंदोलनात सहभागी झालेले माजी सरपंच भारत आडे यांनी सांगितले.
माजी सरपंच म्हणाले की, ग्रामपंचायतीकडे पाणीपुरवठ्यासाठी निधी उपलब्ध आहे. मात्र तो निधी कुठे खर्च होतो हे कोणालाच माहित नाही. प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आम्ही हा घागर मोर्चा काढला आहे.गावातील पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करावी. पाणीपुरवठ्यासाठी आलेला निधी कुठे खर्च झाला याचा हिशोब ग्रामस्थांना द्यावा. आठवडाभर नियमित पाणीपुरवठा करावा.
घागर मोर्चामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असताना प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.