भारत दहशतवादापुढे कधीही झुकणार नाही!

पहलगाम हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त मोदींचा कठोर संदेश

    दिनांक :22-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Year of Pahalgam attack जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण करत भावनिक तसेच ठाम संदेश दिला आहे. मोदी यांनी दहशतवादाविरोधात कठोर भूमिका मांडताना स्पष्ट केले की, भारत कोणत्याही परिस्थितीत दहशतवादापुढे झुकणार नाही. दहशतवाद्यांचे कोणतेही षडयंत्र यशस्वी होऊ दिले जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. या घटनेत प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांना देश कधीही विसरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले की, एक वर्षापूर्वी पहलगाम येथे झालेल्या क्रूर हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला. या घटनेमुळे झालेली वेदना आजही ताज्या आहे आणि त्या कुटुंबांच्या दुःखात संपूर्ण देश सहभागी आहे. त्यांनी सांगितले की, देश म्हणून आपण सर्वजण या दुःखात एकत्र आहोत.
 
 
 
attack modi
 
कारवाईला कठोर प्रत्युत्तर देणार
दरम्यान, भारतीय सैन्यानेही या घटनेच्या पार्श्वभूमीवर कठोर संदेश दिला आहे. दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांना इशारा देताना सैन्याने म्हटले आहे की भारताविरुद्ध केलेल्या कोणत्याही कारवाईला योग्य आणि कठोर प्रत्युत्तर दिले जाईल. न्याय नक्की मिळेल आणि तो नेहमीच मिळत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.या पार्श्वभूमीवर सैन्याने एक विशेष माहितीही शेअर केली असून पहलगाम हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा उल्लेख करण्यात आला आहे. या कारवाईत त्या हल्ल्यातील सूत्रधारांचा खात्मा करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
 
 
 
गेल्या वर्षी पहलगाममधील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य करून अत्यंत क्रूर हल्ला केला होता. धर्म विचारून गोळीबार करण्यात आल्याच्या या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. या हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते.या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती आणि सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत दहशतवाद्यांविरोधात मोहीम राबवली होती. त्या कारवाईत दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली होती. पहलगाम हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पुन्हा एकदा देशभरातून मृतांना श्रद्धांजली वाहिली जात असून दहशतवादाविरोधात ठाम निर्धार व्यक्त केला जात आहे.