ढाका
Nayan Das बांगलादेशातील कॉक्स बाजार टेकड्यांमध्ये एका पुजाऱ्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. प्राथमिक माहितीनुसार, पुजारी गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होते. मृतदेह सापडल्याने हिंदू समाजात भीतीचे वातावरण पसरले आहे. ही हत्या आहे की आत्महत्या, हे निश्चित करण्यासाठी बांगलादेश पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, कॉक्स बाजार सदर उपविभागात एका मंदिराच्या पुजाऱ्याचा मृतदेह गळ्यात स्कार्फ गुंडाळलेल्या अवस्थेत झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळला. ते गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होते. कॉक्स बाजार सदर मॉडेल पोलीस ठाण्याचे प्रमुख मोहम्मद समीउद्दीन यांनी सांगितले की, खुरुशखुल युनियनच्या दुर्गम डोंगराळ भागात बुधवारी दुपारी हा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. मृत पुजाऱ्याचे नाव नयन दास आहे. ते त्याच युनियनमधील पुलिशशोरा घोना नागपंचमी मंदिरात पुजारी म्हणून कार्यरत होते. कॉक्स बाजार पूजा उदयपन परिषदेचे सरचिटणीस जॉनी धर यांनी कुटुंबीयांच्या हवाल्याने सांगितले की, १९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अनोळखी लोकांकडून फोन आल्यानंतर नयन घरातून बाहेर पडला आणि परत आलाच नाही.
कुटुंबीयांनी २० एप्रिल Nayan Das रोजी तक्रार दाखल केली. कुटुंबीयांनी २० एप्रिलच्या रात्री कॉक्स बाजार सदर मॉडेल पोलीस ठाण्यात नयन हरवल्याची तक्रार दाखल केली. दुसऱ्या दिवशी, स्थानिक रहिवासी आणि नयनच्या सहकाऱ्यांनी आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध सुरू केला. बुधवारी दुपारी, ३०-३५ लोकांच्या एका गटाला मंदिराच्या पूर्वेकडील टेकडीवर मृतदेह दिसला आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, अहवालातून ही हत्या आहे की आत्महत्या, हे निश्चित होईल. स्थानिकांनी या मृत्यूची योग्य आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.