गोंदिया,
Gondia rape case लग्नासाठी नकार दिल्याच्या रागातून एका नराधमाने गावातीलच अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केले. इतकेच नव्हे तर, पीडितेचे हात-पाय आणि तोंड बांधून तिला जिल्हा परिषद शाळेच्या खोलीत डांबून ठेवल्याची संतापजनक घटना जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात बुधवारी २२ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सुमित देवानंद ऊईके (२१) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी दवनीवाडा पोलिसांनी ‘पोक्सो'सह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून रात्री उशिरापर्यंत आरोपीला अटक केली आहे.
गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील धक्कादायक घटना : आरोपी अटकेत
मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन पीडित मुलगी आणि आरोपी सुमित ऊईके हे एकाच गावातील रहिवासी असून गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यात ओळख होती. तीन महिन्यांपूर्वी आरोपीने पीडितेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. मात्र, त्यानंतरही आरोपीचा छळ थांबला नाही. घटनेच्या दिवशी आरोपीने पीडितेला जीवे मारण्याची धमकी देऊन तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले आणि तिचे अपहरण केले. त्याने तिला गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या एका खोलीत नेले. तिथे ‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला जीवे मारीन' अशी धमकी देत लग्नासाठी दबाव टाकला. पीडितेने ठामपणे नकार दिला असता, आरोपीने क्रुरतेचा कळस गाठला. त्याने पीडितेचे तोंड, हात आणि पाय ओढणीने घट्ट बांधून तिला त्याच खोलीत बंद केले आणि स्वतः तिथून पळ काढला. दुसर्या दिवशी शाळा उघडल्यानंतर हा प्रकार समोर आला. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून दवनीवाडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३७(२), १४२, ६४(१), ३५१(२) आणि पोक्सो कायद्याच्या कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. शाळेसारख्या पवित्र ठिकाणी घडलेल्या या भीषण कृत्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत अटक केल्याची माहिती तिरोड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांनी बोलताना दिली आहे.