हरियाणा
Divyanka Sirohi हरियाणवी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिव्यांका सिरोही यांचे मंगळवार, २१ एप्रिल रोजी वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अचानक निधनाने चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडिया वर्तुळात शोककळा पसरली आहे.
दिव्यांका सिरोही या हरियाणवी म्युझिक व्हिडिओंसाठी विशेष ओळखल्या जात होत्या. सोशल मीडियावर त्यांचा मोठा चाहतावर्ग असून त्यांच्या डान्स व्हिडिओंना आणि रील्सना लाखो व्ह्यूज मिळत असत. त्यांनी अनेक प्रसिद्ध हरियाणवी कलाकारांसोबत काम केले होते आणि ५० हून अधिक गाण्यांमध्ये त्या झळकल्या होत्या.मिळालेल्या माहितीनुसार, दिव्यांकाचे अंत्यसंस्कार त्यांचे भाऊ हिमांशू सिरोही यांनी पार पाडले. त्यांच्या पश्चात कुटुंबीयांमध्ये भाऊ, बहिणी आणि इतर नातेवाईक आहेत.
दरम्यान, त्यांच्या निधनानंतर Divyanka Sirohi त्यांची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्या निळ्या रंगाचा लेहेंगा परिधान करून ‘बरसाना मिला है’ या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहेत. या व्हिडिओवर आता चाहत्यांकडून शोकसंदेशांचा वर्षाव होत असून अनेकांनी त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना केली आहे.दिव्यांका सिरोही यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांना लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड होती. टिकटॉकवरील त्यांच्या एका व्हिडिओने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती, ज्यामुळे त्या सोशल मीडियावर एक ओळखीचे नाव बनल्या होत्या.त्यांच्या अकाली निधनामुळे हरियाणवी मनोरंजन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.