बिहार
Patna child murder case बिहारची राजधानी पटणा येथून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बायपास पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाहेरील बेगमपूर सती चौरा परिसरात 10 वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत गल्लीत आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोशनी कुमारी नावाची ही अल्पवयीन मुलगी बुधवारी सकाळी शालेय गणवेशात घरातून दूध आणण्यासाठी बाहेर गेली होती. त्यानंतर तिला शाळेत जायचे होते, मात्र ती शाळेतही पोहोचली नाही आणि घरीही परतली नाही. बराच वेळ शोधाशोध करूनही तिचा काहीच थांगपत्ता न लागल्याने कुटुंबीयांनी त्याच दिवशी पोलीस ठाण्यात जाऊन हरविल्याची तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला होता. मात्र, 24 तासांनंतर गुरुवारी सकाळी रोशनीचा मृतदेह घरापासून काही अंतरावर असलेल्या गल्लीत सापडला. विशेष म्हणजे, तिचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत होता. घटनास्थळी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तिच्या चेहऱ्यावर जखमा असून शरीरावरही अनेक ठिकाणी मारहाण केल्याचे आढळले आहेत, ज्यामुळे तिचा निर्घृणपणे खून झाल्याचे स्पष्ट होत आहे.
घटनेचे ठिकाण पोलीस Patna child murder case ठाण्यापासून अवघ्या अर्ध्या किलोमीटर अंतरावर असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बायपास पोलीस ठाण्याचे ठाणेप्रमुख रंजीत कुमार यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात हा खून असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून फॉरेन्सिक सायन्स लॅबची (FSL) टीमही घटनास्थळी पाचारण करण्यात आली आहे.या घटनेनंतर मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक घटनास्थळी जमा झाले होते. दरम्यान, रोशनीच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून तिच्या आईचा आक्रोश पाहून परिसरातील वातावरण अधिकच भावनिक झाले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत करण्यात आली आहेत.