शिमला
president droupadi murmu भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २७ एप्रिल ते २ मे या कालावधीत शिमला दौऱ्यावर येणार असून या विशेष भेटीदरम्यान राष्ट्रपती सचिवालय तात्पुरते दिल्लीहून शिमला येथे हलवले जाणार आहे. या सहा दिवसांच्या काळात राष्ट्रपती भवनाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या प्रशासकीय कामकाजाचा कारभार शिमल्यातूनच पार पडणार आहे.
राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेश सरकारने सर्व तयारी पूर्ण केली असून सुरक्षेसह आवश्यक प्रशासकीय व्यवस्था अधिक काटेकोर करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या या वास्तव्यात राष्ट्रपती भवन मधील महत्त्वाच्या फायली शिमल्यात आणल्या जाणार असून सचिवालयातील अधिकारी आणि कर्मचारी येथेच कार्यरत राहतील.या तात्पुरत्या स्थलांतरामागे ऐतिहासिक आणि घटनात्मक परंपरा कारणीभूत आहे. देशात राष्ट्रपतींची अधिकृत निवासस्थाने मर्यादित असून त्यापैकी शिमला आणि हैदराबाद ही दोन महत्त्वाची ठिकाणे दिल्लीबाहेर आहेत. शिमल्यातील माशोब्रा परिसरातील ‘द रिट्रीट’ हे राष्ट्रपतींचे निवासस्थान विशेष महत्त्व राखते.माशोब्रा येथे असलेले हे निवासस्थान सुमारे १७५ वर्षांहून अधिक जुने असून त्याची बांधणी पारंपरिक धज्जी (लकडी व माती मिश्रित) शैलीत करण्यात आली आहे. भूकंपरोधक वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध असलेली ही वास्तुशैली उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात उबदार वातावरण राखते. शिमल्यापासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर वसलेले हे ठिकाण निसर्गरम्य टेकड्यांमध्ये असल्याने त्याचे सौंदर्य अधिक उठून दिसते.
झाले होते उद्घाटन
‘द रिट्रीट’मध्ये विस्तीर्ण president droupadi murmu सफरचंद बाग असून त्यात तीनशेहून अधिक झाडे विविध विदेशी जातींसह जोपासली गेली आहेत. तसेच येथे ट्यूलिप फुलांची आकर्षक बागही असून काही वर्षांपूर्वी राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते तिचे उद्घाटन करण्यात आले होते. या संपूर्ण परिसरातून सभोवतालच्या निसर्गाचे मनोहारी दृश्य पाहता येते.दौऱ्यादरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव माशोब्रा येथील राष्ट्रपती निवासस्थान सामान्य नागरिक आणि पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. मात्र ३ मे पासून ते पुन्हा पर्यटकांसाठी खुले केले जाणार आहे. काही वर्षांपूर्वी राष्ट्रपतींच्या निर्देशानुसार हे निवासस्थान पर्यटकांसाठी खुले करण्यात आले होते आणि तेव्हापासून ते हिमाचलमधील एक महत्त्वाचे पर्यटन आकर्षण ठरले आहे.राष्ट्रपतींच्या या शिमला दौऱ्यामुळे केवळ प्रशासकीय कार्यवाहीचे विकेंद्रीकरणच अधोरेखित होत नाही, तर देशाच्या ऐतिहासिक राष्ट्रपती निवासस्थानांचे महत्त्वही पुन्हा एकदा प्रकाशझोतात येत आहे.