अग्रलेख...
अमेरिका हा जगातील सर्वांत जुना लोकतांत्रिक देश आणि वर्तमानातली एकमेव जागतिक महाशक्ती. आर्थिक, लष्करी आणि औद्योगिक प्रगतीत अमेरिकेची बरोबरी कुणीही अद्याप करू शकलेले नाही. सर्व क्षेत्रांतील अद्ययावत तंत्रज्ञान त्या देशाकडे आहे. अमेरिकेचा व्हिसा हा जगातील सर्वाधिक शक्तिशाली व्हिसा समजला जातो. मानवी मूल्ये तसेच कायदेशीर घटनात्मक अधिकारांचे जेवढे जतन आणि संवर्धन अमेरिकेत आतापर्यंत होत होते, तेवढे खचितच जगातील अन्य कोणत्याही देशात होत असावे. पण गेल्या काही दिवसात अमेरिकेची ही ओळख पुसून टाकण्याचे ‘पवित्र’ कार्य त्या देशाच्या राष्ट्रपतींनीच हाती घेतले आहे. Donald Trump डोनाल्ड ट्रम्प हे त्यांचे नाव. त्यांच्या काळात मानवतेचे मारेकरी अशी अमेरिकेची नवी ओळख जगात झाली आहे. ट्रम्प यांची वागणूक अतिशय विचित्र, विक्षिप्त, बेमुर्वत आणि आढ्यताखोर आहे. आपल्या वागणुकीने त्यांनी शत्रूंना आणखी कट्टर शत्रू केले आणि पारंपरिक मित्रांनाही शत्रू बनण्यास भाग पाडले.
रेडियो होस्ट मायकल सॅवेज यांची एक भारतविरोधी पोस्ट ट्रम्प यांनी रिपोस्ट केली. यात सॅवेज यांनी भारतविरोधी विषारी फुत्कार सोडले होते. सॅवेज यांची ट्रम्प यांनी रिपोस्ट केली, याचा अर्थ सॅवेज यांच्या भारतविरोधी मताशी आणि भूमिकेशी ट्रम्प महाशय सहमत आहेत, असाच निघतो. एरवीही ट्रम्प कधी काय बोलतील वा त्यांच्या तोंडातून कशी आणि कोणती मुक्ताफळे बाहेर पडतील, याचा अंदाज करता येत नाही. अमेरिकेला सभ्य आणि लोकशाहीवादी राष्ट्राध्यक्षांची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. या सर्व राष्ट्राध्यक्षांनी मान उंचावली. एखादा अपवाद वगळता अमेरिकेचा प्रत्येक राष्ट्राध्यक्ष व्यक्ती म्हणूनही चांगल्या वळणाचा असे. ट्रम्प यांची तुलनाच पूर्वीच्या कुण्या राष्ट्राध्यक्षांशी करता येत नाही इतके हे महाशय ‘थोर’ निघाले. ट्रम्प यांनी आपल्या वाहियात आणि वाचाळ वक्तव्यांनी तसेच कृतीने स्वत:सोबत अमेरिकेची प्रतिष्ठाही पायदळी तुडवली. आंतरराष्ट्रीय समुदायाला वारंवार अडचणीत टाकले. आजपर्यंतच्या इतिहासात एवढा नाठाळ आणि निर्ढावलेला अध्यक्ष अमेरिकेला मिळाला नाही. अध्यक्ष म्हणून आपण काय बोलावे, कसे वागावे, याचा कोणताही मागमूस यांच्या वर्तनात नाही. एखादा वेडा इसम तरी बरा वागेल, एखादा विक्षिप्त किंवा टग्या माणूसही कदाचित बरे वर्तन करेल. त्यांनाही लाजविणारी भाषा जगाला सभ्यतेचे धडे देणार्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वापरत आहेत. ट्रम्प यांनी आपल्या समस्त अमेरिकी जनतेचीही मान खाली झुकवली आहे. आम्ही कोणते पाप केले, की म्हणून असा अध्यक्ष आमच्या पदरी पडला, अशी तक्रारही आता अमेरिकी जनता करू शकत नाही. कारण या जनतेनेच त्यांना दुसर्यांदा निवडून दिले. त्यांनी आपल्या चुकीची पुनरावृत्ती केली. अमेरिकेच्या विद्यमान प्रतिमा भंजनासाठी ट्रम्प जेवढे जबाबदार आहेत, तेवढीच अमेरिकेच्या मतदारांचीही आहेच. आता किमान पावणेतीन वर्षे अमेरिकेन जनतेला ट्रम्प कितीही मान्य नसले, पटत नसले तरी सहन करावे लागणार आहे. अमेरिकन जनतेला एवढा काळ तरी हे न पटणारे सौभाग्य आपल्या माथ्यावर मिरवावे लागणार आहे.
‘खोटं बोल पण रेटून बोल’ यावर Donald Trump ट्रम्प यांचा विश्वास आहे. आपण जे बोलतो, त्यावर अमेरिकी जनता आणि सहज विश्वास बसतो, असा त्यांचा समज आहे. खरे तर तो त्यांचा गैरसमज आहे. एव्हाना अमेरिकेची जनता आणि उर्वरित जगालाही ट्रम्प नावाची चीज किती विचित्र आणि फालतू आहे, हे कळून चुकले आहे. उचलली जीभ लावली टाळूला अशाच धर्तीची ट्रम्प यांची सर्व विधाने असतात. कधी महिला पत्रकाराला तुम्ही देखण्या आहात असे आणि कधी एखाद्याच्या मृत्यूची बातमी आली तर बरे झाले, तो गेला, असे उद्गार काढणे ही त्यांची सभ्यता. अशी कित्येक उदाहरणे सापडतील. जन्मजात नागरिकत्व अमेरिकेशिवाय दुसरा कोणताही देश देत नाही, असे ट्रम्प म्हणाले. पण जगातील ३६ देश त्यांच्या देशात जन्मलेल्याला नैसर्गिक स्वरूपात नागरिकत्व देतात, हे वास्तव ते लपवून ठेवतात. खोटे आपण अमेरिकेसारख्या देशाचे अध्यक्ष आहोत, याचेही भान ट्रम्प यांना राहात नाही वा ते ठेवत नाहीत. अध्यक्षपदाचा ट्रम्प यांचा पहिला कार्यकाळ दुसर्या कार्यकाळापेक्षा खूप चांगला होता, असे म्हणावे लागते. दुसर्या कार्यकाळात ट्रम्प यांचे वर्तन आधीच मर्कट त्यात मद्य प्याला असे झालेले दिसते.
लहरी आणि विक्षिप्त वर्तन व वक्तव्यांमध्ये भर म्हणून यांनी अमेरिकेतच नाही तर जगातही हिंसेचे तांडव सुरू केले. अमेरिकेने याआधीही जगातील अनेक लहान-मोठ्या देशावर आक्रमण करीत त्यांचा घास घेतला. अमेरिकेने आपल्या पाशवी महत्त्वाकांक्षेपोटी हातात छडी घेऊन जगाला धडा शिकविण्याचा प्रयत्न अनेकदा केला. ट्रम्प यांनी तर त्यात मोठीच आघाडी घेतली. अख्खे आखात त्यांनी संकटात टाकले. जगातील इतर देशांनाही त्रास अशा पद्धतीने जगात अशांतता निर्माण करणारे ट्रम्प शांततेच्या नोबल पुरस्कारावर दावा करतात, हा फारच मोठा विनोद म्हटला पाहिजे. जगातील सगळ्यात विकृत, विचित्र व विक्षिप्त राष्ट्रप्रमुख म्हणून एखादी स्पर्धा घेतली तर त्यात ट्रम्प यांची अव्वल नंबरवर निवड झाल्याशिवाय राहणार नाही. सामान्यपणे कोणत्याही देशाच्या राष्ट्रप्रमुखाला मुत्सद्देगिरीने वागावे लागते. मुत्सद्देगिरीची भाषा बोलावी खरा राजकीय नेता तोच असतो, ज्याला काय बोलावे, यापेक्षा काय बोलू नये, हे कळते. राजनयिक वा मुत्सद्यांनाही काय बोलावे यापेक्षा काय बोलू नये, हे कळायला हवे. आंतरराष्ट्रीय व्यवहाराचे काही पायंडे आहेत, तसे ते राष्ट्रप्रमुखपदावर बसलेल्या व्यक्तींनी कसे बोलावे, वागावे याबद्दलही आहेत. त्यांचा लवलेशही ट्रम्प यांच्या वर्तनात नाही. त्यांनी चीन भारताबाबत नुकतेच जे विधान केले, त्याचा करावा तेवढा निषेध कमी आहे. चीन आणि भारत यांचा उल्लेख ट्रम्प यांनी ‘नरकाचे प्रवेशद्वार’ असा केला. या वक्तव्यातून ट्रम्प यांनी चीन आणि भारतातील जनतेचा घोर अपमान केला. चीन हा अमेरिकेचा मित्र नसला, तरी भारत हा अमेरिकेचा मित्र आहे. जेव्हा जेव्हा शक्य होते, तेव्हा अमेरिकेला पाठिंबा दिला. अमेरिकेचा जो गाडा आज आपल्याला सुरळीत चालल्यासारखा दिसतो त्यामागे अमेरिकेतील भारतीय नागरिकांचे मोठे योगदान आहे. अमेरिकेच्या समाजजीवनातून भारतीय नागरिक वगळले, तर अमेरिकेचा डोलारा खाली कोसळायला वेळ लागणार नाही. अशा देशाचा उल्लेख ट्रम्प यांनी नरकाचे प्रवेशद्वार असा केला, याबद्दल समस्त भारतीयांनी चवताळून उठले पाहिजे.
अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात चीनने अमेरिकेविरुद्ध इराणला मदत केली. म्हणजे चीन त्या युद्धात अप्रत्यक्षपणे अमेरिकेच्या विरोधात उतरला. पण भारताने अशी कोणतीच भूमिका घेतली नाही. खरे तर इराणही भारताचा मित्रदेश आहे आणि अमेरिकाही मित्र आहे. भारताने या युद्धात कोणत्याही एका पक्षाची बाजू न घेता संतुलित आणि संयमी भूमिका घेतली, याची जाणीव अमेरिकेने हवी होती. Donald Trump ट्रम्प यांच्या उन्मत्त आणि युद्धखोर मानसिकतेने अमेरिकेतील त्यांची लोकप्रियता झपाट्याने खाली घसरली आहे. जोपर्यंत ते अमेरिकेचे अध्यक्ष आहेत, तोपर्यंत ते स्वत:ची आणि अमेरिकेचीही जगातील प्रतिमा काळवंडणार आहेत आणि या ना त्या पद्धतीने विविध देशांना-समुदायांना संकटात टाकणार आहेत, हे नक्की. अमेरिकन जनतेच्या वतीने तिथल्या राजकारण्यांनी त्यांच्याविरुद्ध अविश्वास आणून अध्यक्ष पदावरून पदच्युत केले पाहिजे. अन्यथा ट्रम्प अमेरिकेलाच नव्हे तर जगालाही महाग पडतील, हे नक्की.