आमदार डॉ. नरोटे यांचा ‘अ‍ॅक्शन मोड’

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
धानोरा, 
स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी दिवसातील 18 तास पुस्तकात डोकं खुपसून बसणार्‍या धानोर्‍यातील विद्यार्थ्यांना आता सुसह्य वातावरणात अभ्यास करता येईल, अशी आशा आहे. स्थानिक नगर पंचायत सार्वजनिक अभ्यासिकेतील कमालीचे उष्ण वातावरण आणि मूलभूत सोयीसुविधांचा अभाव पाहून MLA Dr. Milind Narote आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी नगरपंचायत प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली. केवळ कागदी घोडे न नाचवता अभ्यासिकेत तातडीने वातानुकूलित यंत्रणा (एसी) आणि पिण्याच्या थंड पाण्याची सोय करण्याचे कडक निर्देश त्यांनी दिले आहेत.
 
 
Narote
 
धानोरा येथील नगर पंचायत अभ्यासिकेत तालुक्यातील ग्रामीण भागातील शेकडो मुले-मुली स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. मात्र, वाढत्या उन्हामुळे या अभ्यासिकेची अवस्था एखाद्या बंदिस्त कोठडीसारखी झाली होती. दमट हवा आणि खेळत्या हवेच्या अभावामुळे घामाच्या धारा वाहत असताना एकाग्रतेने अभ्यास करणे विद्यार्थ्यांना कठीण जात होते. विद्यार्थ्यांची ही ‘होरपळ’ प्रत्यक्ष पाहण्यासाठी आमदार डॉ. नरोटे यांनी अभ्यासिकेला सदिच्छा भेट दिली आणि विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांच्या कष्टाची जाणीव प्रशासनाला नसावी, ही शोकांतिका आहे, अशा शब्दांत आमदारांनी आपली नाराजी व्यक्त केली. उन्हाळ्याच्या तडाख्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर आणि अभ्यासावर परिणाम होऊ नये, यासाठी संपूर्ण अभ्यासिका वातानुकूलित करण्याचे आदेश त्यांनी नगरपंचायत प्रशासनाला दिले. तसेच उन्हाळ्यात पिण्याच्या थंड पाण्याची टंचाई भासू नये यासाठी कायमस्वरूपी जलशुद्धीकरण यंत्रणा बसवण्याच्याही सूचना त्यांनी केल्या.
 
 
याप्रसंगी MLA Dr. Milind Narote  आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्यासोबत भाजपा तालुकाध्यक्ष साजन गुंडावार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, सचिव सारंग साळवे, महामंत्री सुभाष धाईत, नगरसेवक संजीव कुंडू, पत्रकार भूषण कुकडकर, भाजपा कोषाध्यक्ष सुभाष खोबरे, सुशील श्रीपतवार, राकेश खरवडे, नंदू शेंद्रे, सौरव सहारे, गणेश भूपतवार, गजानन परचाके व भाजपाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदारांच्या या धडाकेबाज भेटीनंतर आणि प्रशासनाला दिलेल्या ‘फटकारा’मुळे विद्यार्थ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. यशासाठी घाम गाळणार्‍या या विद्यार्थ्यांना आता खरोखरच गारवा मिळणार की प्रशासकीय फाईलींमध्ये हे काम रखडणार, याकडे आता संपूर्ण तालुक्यातील व शहरातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.