अवैध धंदेवाल्याकडून पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल

पुण्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
पुणे
Pune police suspension, अवैध धंदे चालकाकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पुणे शहर पोलिस दलात मोठी खळबळ उडाली असून, सहायक पोलिस फौजदारासह एका पोलिस हवालदाराला निलंबित करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी ही कारवाई केली आहे.
 

 Pune police suspension, 
मिळालेल्या माहितीनुसार, सहायक पोलिस फौजदार बापुसाहेब किसनराव खुटवड आणि पोलिस हवालदार अमोल प्रकाश पवार हे सहकारनगर पोलिस ठाण्याच्या तपास पथकात कार्यरत होते. मार्च महिन्यात या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ते अभिजित मारुती गायकवाड या अवैध धंदे चालकाकडून आर्थिक देवाणघेवाण करताना दिसत असल्याचा आरोप आहे.या प्रकारामुळे पोलिस दलाच्या शिस्तीला आणि प्रतिमेला बाधा पोहोचल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे आर्थिक व्यवहार करणे हे पोलिस सेवेत गंभीर गैरवर्तन मानले जाते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्राथमिक चौकशी करण्यात आली आणि त्यात संशयास्पद वर्तन आढळल्याने दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.
या घटनेनंतर पोलिस दलातील शिस्त आणि पारदर्शकतेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संबंधितांवर आणखी प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.