दिवसा वीज स्वस्त रात्रीची महाग
महावितरणचे नागरिकांना आवाहन
अमरावती,
Amravati Mahavitaran महावितरणला सौरऊर्जेमुळे मोठ्या प्रमाणात आणि स्वत वीज मिळत आहे. परंतू, रात्रीच्या विजेसाठी महावितरणला पारंपरिक म्हणजेच कोळश्याच्या विजेवर अवलंबून रहावे लागते. पारंपरिक वीज ही महाग आणि सरासरी १० रूपये प्रमाणे विकत घ्यावी लागते, पर्यायाने त्या महाग विजेचा भुर्दंड अंतिमरित्या वीज ग्राहकांवरच पडतो. त्यामुळे वीज ग्राहकांनी जास्त वीज लागणार्या उपकरणाचा वापर स्वस्त विजेच्या वेळेत म्हणजेच दिवसा करावा, असे आवाहन मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी केले आहे. अमरावती परिमंडळात सुमारे २ लाख ५० हजार कृषी ग्राहक आहेत.
परिमंडळात मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेत सौर प्रकल्प स्थापित झाल्याने सुमारे १.५ लाख कृषी ग्राहकांना दिवसा विज देण्यात येते. तसेच इतर वर्गवारीतील सुमारे १२ लाख ग्राहकापैकी ३ टक्के वीज ग्राहकांनी आपल्या घराच्या छतावर सौर प्रकल्प उभारले असून मोठ्याप्रमाणात एसी व तत्सम उपकरणे वापरायला सुरूवात केली आहे. परंतू, त्यांनीही दिवसा आणि रात्रिच्या वीज वापराचे गणित समजून घेत जास्तित जास्त वीज वापर दिवसा शिफ्ट करणे आवश्यक आहे. वीज ग्राहकांनी दिवसा वापरलेल्या विजेवर जुलै २०२५ पासून प्रति युनिट ८० पैशाची सवलत एप्रिल २०२६ पासून ८५ पैसे झाली आहे. परंतू, महावितरणच्या या सवलतीच्या लाभ घेण्यासाठी वीज ग्राहकांनी स्मार्ट टिओडी मीटर लावणे गरजेचे असल्याचेही महावितरणने स्पष्ट केले.
तर संपूर्ण फिडर अंधारात जाऊ शकते
Amravati Mahavitaran अमरावती परिमंडळात १४२ फिडर हे मिश्र स्वरूपाचे आहे, या फिडरवरून त्या फिडर परिसरातील गावांना आणि कृषी ग्राहकांना वीज पुरवठा होतो. मिश्र फिडर असल्याने या शेतकर्यांना २४ तास वीज उपलब्ध आहे. परंतू, ४५ अंश पार झालेल्या तापमानामुळे विजेचा वाढता वापर आणि रात्रीच्या महाग विजेचा भुर्दंड बघता, या फिडरवरील शेतकर्यांनी रात्री विजेचा वापर करू नये, असे झाल्यास अतिभारामुळे संपूर्ण फिडर हे अंधारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या फिडरवरील शेतकर्यांनी दिवसाच विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.