अमरावती,
Amravati Municipal Corporation महानगरपालिकेची २० एप्रिलला स्थगित झालेली आमसभा गुरूवारी पुन्हा झाली. या सभेत शहरातल्या मोकाट कुत्र्यांच्या हैदोसाचा मुद्दा चांगलाच तापला. जवळपास सर्वच सदस्यांनी एकमुखाने ठोस उपायोजना करण्याची मागणी केली. सभापतींनी या संदर्भात तातडीने बैठक घेऊन आवश्यक कारवाई तातडीने करण्याचे निर्देश दिले आहे.
आमसभेत साफसफाईचा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला. कंत्राटदार कोणार्क कंपनीला झोन क्रमांक ३ दस्तूरनगर येथे स्वच्छतेचे कंत्राट घेऊन शुक्रवारी तीन महिने पूर्ण होत आहे. ज्या अटी व शर्ती करारनाम्यान देण्यात आले आहे, त्या पूर्ण करण्याची मुदत उद्या संपते आहे. कंपनीने करारनाम्यानुसार सुविधा व साहित्य उपलब्ध करून दिले की, नाही यांची तपासणी करण्याची मागणी सदर झोन अंतर्गत येणार्या नगरसेवकांनी केली. सभापतींनी मागणीनुसार खातरजमा करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. शहरातील नाले सफाई २५ मेपर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही प्रशासनाने दिली. सीसीटीव्हीवर चर्चा झाली. मनपा अस्थापनावर असलेल्या सफाई कर्मचार्यांना चक्राकार पद्धतीने साप्तहीक रजा देण्याची मागणी करण्यात आली. लवकरच त्यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे. इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी आवश्यक जागेचे प्रकरण उच्च न्यायालयात निर्णयासाठी आहे. त्यावर लवकर निर्णय व्हावा म्हणून न्यालयाकडे विनंती अर्ज करावा, अशी मागणी सदस्यांनी केली. ती मान्य करण्यात आली.
शहरातली चपराशीपुरा स्मशानभूमीत Amravati Municipal Corporation टाकण्यात येणार्या कचर्याला या भागातल्या सदस्यांनी जोरदार विरोध केला. याचवेळी शहरातल्या पश्चिम भागातील कब्रस्तानातल्या अडचणींचा मुद्दा सदस्यांनी मांडला. दोन्ही विषय निकाली काढण्याचे निर्देश सभापतींनी दिले. दलीतवस्ती विकास निधी योग्य पद्धतीने खर्च झाला नसल्याच्या मुद्दावर काही सदस्य फारच आक्रमक झाले होते. मंगेश मनोहरे, विलास इंगोले, बबलू शेखावत यांनी उदाहरणासह सदर विषय सभागृहात मांडला. मोकाट कुत्र्यांचा विषय अॅड. प्रिती रेवणे, मिलिंद बांबल यांच्यासह इतरांनी पोटतिडकीने लावून धरला. याशिवाय अन्य विषयांवर सभागृहात चर्चा झाली.
महिला नगरसेविका आरक्षणासाठी आक्रमक
भाजपा महायुतीच्या सर्वच महिला नगरसेविकांनी आज महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते सभागृहापर्यंत महिला आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणा देत मोर्चा काढला. आरक्षणाला विरोध करणार्याचा त्यांनी निषेध केला. सभागृहात येताच त्यांनी काँग्रेसचे नगरसेवक मिलिंद चिमोटे यांना घेराव घातल जाब विचारला. त्यांनी या नगरसेविकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर आंदोलन थांबले.