अंजनगाव बाजार समितीचे १७ संचालक अपात्र

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
जिल्हा उपनिबंधकाचा निकाल
अंजनगाव सुर्जी, 
जिल्ह्यात भाजप प्रणीत एकमेव असलेल्या Anjangaon Surji Agricultural Produce Market Committee अंजनगाव सुर्जी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला अपात्र ठरवण्यात आले आहे. या कारवाईमुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली असून तालुक्यातील भाजपाच्या सहकारातील सत्तेला खिळ बसला आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दाखल अपीलचा निकाल २४ एप्रिल रोजी जाहीर झाला. त्यानुसार बाजार समितीच्या १७ संचालकांना अपात्र ठरवण्यात आले. नियमबाह्य खर्च, महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ च्या कलम ११, १२(१), १३, २९, ३७(२)(५) चा भंग, अर्थसंकल्प विहित मुदतीत मंजूर न करणे आणि उपविधीचे उल्लंघन या कारणांमुळे जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांचे आदेशान्वये अपात्रतेची कारवाई करण्यात आली.
 
 
surji
 
Anjangaon Surji Agricultural Produce Market Committee  महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती (समितीची निवडणूक) नियम २०१७ च्या नियम १०(१)(आय) नुसार सर्व १७ संचालक अपात्र ठरले आहेत. सहकारातील सत्ताधारी गटाचे राजकीय विरोधक शरद साबळे, सुधीर अढाऊ व विनायक वाघ यांनी संचालक मंडळाविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. नियमबाह्य खर्च, कलमभंग आणि अर्थसंकल्पाबाबतचे आक्षेप यात घेण्यात आले होते. सहकार क्षेत्रात कमकुवत असलेल्या भाजपासाठी अंजनगाव सुर्जी बाजार समिती ही जिल्ह्यातील एकमेव सत्ता होती. युवा संचालक मंडळाने बाजार समितीला स्थापनेनंतरची सर्वोच्च वाढवा मिळवून देत कोटींची शिल्लक ठेवली होती. विकासकामांना गती दिली जात असतानाच हा आदेश धडकला. या निर्णयामुळे केवळ तालुकाच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यातील सहकार वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. संचालक मंडळ बरखास्त झाल्याने आता बाजार समितीवर प्रशासक नेमला जाण्याची शक्यता आहे. या निर्णयाविरोधात संचालक मंडळ वरच्या न्यायालयात दाद मागणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आदेशाला आव्हान देणार
विरोधकांच्या राजकीय दबावाला बळी पडून घेतलेला हा निर्णय आहे. शेतकर्‍यांच्या ऊन्नतीसाठी कटीबद्ध असलेल्या आमच्या संचालक मंडळाने कोट्यांवधीची कामे सुरू केली व ती पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. विकासकामात अडथळा आणत विरोधकांच्या षडयंत्राचा बळी म्हणून याकडे पाहावे लागेल. विभागीय सहनिबंधक कार्यालयात आदेशाला आव्हान दिले जाईल. तेथे आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे.
-जयंत साबळे
सभापती, कृ.ऊ.बा.स.,अंजनगाव