- दोन सरपंच व ८ ग्रा.पं. सदस्य पदासाठी केवळ ७ नामांकण कायम
- चार ग्रामपंचायतीत प्रत्येकी एका जागेसाठी एकच अर्ज
सुरेंद्रकुमार ठवरे
अर्जुनी मोरगाव,
Arjuni Morgaon: Gram Panchayat तालुक्यात विविध कारणाने रिक्त झालेल्या २ सरपंच व ८ ग्राम पंचायत सदस्य पदासाठी येत्या २८ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. यात इटखेडा येथील सरपंच पदाच्या निवडणुकीवर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असताना खांबी सरपंच पदासाठी एकमेव अर्ज तर कोहलगाव, विहीरगाव बर्ड्या, ईटखेडा, निमगाव येथील सदस्य पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल असले तरी येरंडी दर्रे, सुकळी, बाकटी येथे कुणीही नामांकन दाखल केला नसल्याने या ग्रामपंचायतींना उमेदवारच मिळेना अशी अवस्था आहे. त्यात दुसरीकडे झरपडा येथील सदस्यांच्या एका जागेसाठी दोन उमेदवारी अर्ज आल्याने या ठिकाणी निवडणूकीचे रणसंग्राम दिसून येणार आहे.
Arjuni Morgaon: Gram Panchayat सरपंच व ग्राम पंचायत सदस्यांचे निधन, राजीनामा, अनहर्ता किंवा इतर कारणांमुळे रिक्त असलेल्या जागांच्या निवडणूक घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यात इटखेडा ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. खांबी येथील ग्रामपंचायत सरपंच पद अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव असून तत्कालीन सरपंच अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून अपात्र झाल्याने या ठिकाणी थेट जनतेमधून सरपंचाची निवड होणार आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अश्विनी घनश्याम लोणारे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे दिसून येत आहे. त्यातच कोहलगाव येथे सर्वसाधारण जागेसाठी शामराव अर्जुन मरसकोल्हे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असताना विहीरगाव बर्ड्या येथे सर्वसाधारण जागेसाठी तुलाराम इस्तारी तवाडे, इटखेड्याच्या सर्वसाधारण स्त्री जागेसाठी भाग्यश्री रवी बोळणे व निमगावच्या नामाप्र स्त्री जागेसाठी मंजुषा संजय कांबळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. असे असले तरी झरपडा येथे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव एकमेव जागेसाठी विश्वनाथ खोब्रागडे व सतीश मेश्राम या दोघांचे उमेदवारी अर्ज कायम असल्याने येत्या २८ एप्रिल रोजी या गावात तालुका प्रशासनाला मतदान प्रक्रिया राबवावी लागणार आहे. दुसरीकडे मात्र, येरंडी दर्रे, सुकळी, बाकटी येथे कुणीही नामांकन दाखल केला नाही. त्यामुळे या तिन्ही गावात निवडणूका होणार नसल्याचे चित्र आहे.